21 February 2019

News Flash

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह ‘या’ ९ देशात गाडी पळवा सुसाट

जाणून घेऊयात ९ देशांबद्दल जिथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन चालवता येते.....

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायन्सन असेल तरच विदेशात वाहन चालवता येते, असा बहुतेकांचा समज असतो. मात्र, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण काही देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास गाडी चालवता येते. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. मात्र, वाहन चालवताना संबंधित देशाचे वाहतुकीचे नियम व निर्देशकांचे काटेकोर पालन करावे लागते. जाणून घेऊयात अशाच ९ देशांबद्दल जिथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन चालवता येते…..

१) अमेरिका : येथे तुम्ही एक वर्षापर्यंत भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह गाडी चालवू शकता, पण तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीत असणे महत्वाचे आहे. मुदत संपल्यानंतर मात्र, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घ्यावे लागते. याशिवाय आय-94 फॉर्म आपल्याजवळ ठेवावा लागत असतो. त्यावर अमे‍रिकेत प्रवेश करण्याची तारीख नमुद केलेली असावी.

२) जर्मनी : भारतीय पर्यटक येथे सहा महिने वाहन चालवू शकतात. यासाठी इंग्रजी भाषेतील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. जर्मनीमध्ये भटकंतीसाठी गेला असाल आणि स्वत : वाहन चालवत असाल तर सर्व कागदपत्रे जवळ बाळगा.

३) दक्षिण आफ्रिका : येथे भारतीय भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर एक वर्ष वाहन चालवू शकता. मात्र, लायसनवरील सर्व मचकूर इंग्रजीत असायला हवा. त्यावर फोटो व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. भटकंतीसाठी गाडी भाड्याने घेत असाल तर तुम्हाला लायसन्स दाखवणे अनिवार्य आहे.

४) स्वित्झर्लंड : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या स्वित्झर्लंडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसनवर एक वर्ष वाहन चालवू शकता. एल्प्सची क्रिस्टल क्लीयर नदी, गाव, डोंगर व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रस्त्यांवर भारतीय पर्यटक वाहन चालवू शकतात. यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसनची काहीच गरज नाही.

५ ) नॉर्वेमध्ये इतर शहरांप्रमाणे तीन महिन्यापर्यंत भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवू शकता.

६) ऑस्ट्रेलिया : नॉर्वेप्रमाणेच येथेही तीन महिने भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवू शकता. न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलंड, दक्षिण ऑस्ट्रेलिया व ऑस्‍ट्रेलिया कॅपिटल टेरिटरीमध्ये भारतीय ड्रायविंग लायसन वैध असेल. जर तुम्ही तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत तुम्ही थांबणार असाल आणि गाडी चालणार असाल तर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन बनवावे लागते.

७) न्यूझीलंड : येथे गाडी चालवण्यासाठी २१ वर्ष वयाची अट आहे. येथेही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवू शकता. पण तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स वैध आणि इंग्रजीत असावे लागते. जर तुमचे लायसन्स इंग्रजीत नसेल तर न्यूझीलंड सरकारडून करून घेऊ शकता.

८ ) फ्रान्स : येथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर एक वर्ष वाहन चालवता येते. पण भारतीय दूतावासातून ड्रायव्हिंग लायसन्स फ्रेन्चमध्ये ट्रान्सलेट करून घ्यावे लागते.

९) इंग्लंड : येथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स एक वर्ष वाहन चालवण्याची सवलत दिली जाते. मात्र, ही सवलत केवळ छोटी वाहने व मोटरसायकलसाठी आहे.

First Published on October 8, 2018 11:50 am

Web Title: countries allow indians to drive with local driving licences