डॉ. संदीप पाटील

‘कोविड-१९’ महासाथीच्या काळादरम्यान ताप आल्यास विषाणूची लागण झाल्याचा संशय निर्माण होतो आणि त्यासंदर्भात चाचणी केली जाते. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, एंटरिक फिव्हर, व्हायरल हिपॅटायटीस इत्यादी प्रकारच्या तापांचा समावेश आहे. हे आजार झाल्यास त्यांचे वेळेवर निदान व उपचार करणे आवश्यक आहे. वैद्यकीय इतिहास जाणून घेत आणि अभ्यास केल्यास तापाच्या प्रकारांमधील फरक समजण्यास मदत होईल आणि परिणामी योग्य औषधोपचार ठरवता येईल. पावसाळ्यासंबंधित आजारांसाठी प्रयोगशाळेमध्ये योग्य तपासणी केल्यास तापाच्या कारणांमधील फरक समजण्यामध्ये मदत होऊ  शकते.

इन्फ्लूएन्झा (फ्लू) आणि कोविड-१९ संबंधित तापामध्ये फरक काय आहे हे समजून घ्या.

दोन्हीही श्वसनविषयक आजार असलेले इन्फ्लूएन्झा (फ्लू) आणि कोविड-१९ हे वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. कोविड-१९ आजार नोव्हेल कोरोनाव्हायरस (सार्स-कोव्ह—२) विषाणूमुळे होतो, तर फ्लू आजार इन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. फ्लू व कोविड-१९ आजारांमधील काही लक्षणे समान असल्यामुळे लक्षणांच्या आधारावर दोन्ही आजारांमधील फरक स्पष्ट करणे अवघड असू असते. म्हणून निदानासाठी चाचणी करणे आवश्यक आहे. लक्षणे समान असली तरी दोन्ही आजारांमध्ये प्रमुख फरक आहेत आणि दररोज याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.

दोन्ही आजारांची चिन्हे व लक्षणांमधील समानता व फरक जाणून घेऊ.

समानता

कोविड-१९ व फ्लू आजाराची चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळी असू शकतात, कोणतीच लक्षणे दिसून न येणे (लक्षणे दिसून न येणारा आजार) ते गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येणे.

* ताप किंवा थंडी भरून ताप येणे

* खोकला

* श्वास घेण्यामध्ये त्रास होणे

* थकवा

* घसा खवखवणे आणि नाक वाहणे किंवा नाक चोंदणे

* स्नायू दुखणे किंवा अंगदुखी

* डोकेदुखी

* उलटय़ा व अतिसार (प्रौढांपेक्षा मुलांमध्ये ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येतात)

फरक

* फ्लू विषाणूमुळे सौम्य ते गंभीर आजार होऊ  शकतात, ज्यामध्ये वर उल्लेख केलेली लक्षणे दिसून येतात.

* कोविड-१९ आजारामध्ये फ्लूपेक्षा वेगळी लक्षणे म्हणजेच चव किंवा वास न येणे असू शकते.

गंभीर आजाराचा कोणाला सर्वाधिक धोका आहे?

*  कोविड-१९ व फ्लू विषाणू गंभीर आजार आणि समस्या निर्माण करू शकतात. वृद्ध व्यक्ती, विशिष्ट वैद्यकीय आजार असलेले व्यक्ती आणि गरोदर महिला यांना सर्वाधिक धोका आहे.

* स्वस्थ मुलांसाठी कोविड-१९च्या तुलनेत फ्लू आजार होण्याचा धोका सर्वाधिक आहे. तान्ही मुले आणि वैद्यकीय आजार असलेल्या मुलांना फ्लू व कोविड-१९ आजार होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

* लहान मुलांना फ्लू विषाणूमार्फत गंभीर आजार होण्याचा उच्च धोका आहे.

* कोविड-१९ संसर्ग झालेल्या शालेय मुलांना मल्टीसिस्टम इन्फ्लामेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन (एमआयएस—सी) हा दुर्मीळ आजार होण्यासोबत कोविड-१९चा आजार होण्याचा उच्च धोका आहे.

जटिलता जाणून घ्या

फ्लू आजार झालेले अनेकजण दोन आठवडय़ांपेक्षा कमी दिवसांमध्ये बरे होऊ  शकतात. पण काही जणांमध्ये आजाराची तीव्रता वाढू शकते. कोविड-१९शी संबंधित अतिरिक्त जटिलतांमुळे हृदय, फुफ्फुसे, पाय किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होऊ  शकतात. तसेच मल्टीसिस्टम इन्फ्लामेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन (एमआयएस—सी) आजार होऊ  शकतो. कोविड-१९ व फ्लूमुळे पुढील आजार होऊ  शकतात.

* न्यूमोनिया

* श्वसनयंत्रणेमध्ये बिघाड

* अ‍ॅक्यूट रिस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (म्हणजेच फुफ्फुसामध्ये पाणी जमा होणे)

* सेप्सिस

* हृदयाघात किंवा स्ट्रोम

* विविध अवयवांच्या कार्यामध्ये बिघाड असलेले गंभीर आजार (फुफ्फुसे, हृदय, मज्जासंस्थांशी संबंधित आजार किंवा मधुमेह) अधिक बिकट होणे

* हृदय, मेंदू किंवा स्नायू उतींना सूज येणे

* दुय्यम जीवाणू संक्रमण (दुसऱ्यांदा फ्लू / कोविड-१९ सह जीवाणू संसर्ग होणे)

उपचार समजून घ्या

जटिलतांचा उच्च धोका असलेल्या किंवा कोविड-१९ अथवा फ्लूवरील उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही लक्षणे व जटिलतांमधून बरे होण्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावा. ‘ओसेल्टामावीर’सारखी इन्फ्लूएन्झा अ‍ॅण्टीव्हायरल औषधे फ्लूवरील उपचारासाठी एफडीए मान्यताकृत आहेत आणि ही औषधे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. रेमडेसिवीर हे कोविड-१९ उपचारासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅण्टीव्हायरल औषध आहे आणि इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (ईयूए) अंतर्गत उपलब्ध आहे.