आपल्याला बराच मोकळा वेळ असूनही शारीरिक हालचाली व व्यायाम करण्यास नेहमीच नकारघंटा असते, पण जे लोक व्यायाम करतात त्यांच्यात सात प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असे अभ्यासातून दिसून आले आहे. कर्करोगावर आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनाचा आढावा घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला असून त्यामुळे या रोगावरील उपचाराची दिशा बदलता येऊ शकते.

अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार शारीरिक व्यायामाने कर्करोगाची जोखीम कमी होते. आतापर्यंत जे संशोधन अहवाल या विषयावर लिहिले गेले त्यातून हीच गोष्ट अधोरेखित होते. क्लिनिकल ऑन्कॉलॉजी या नियतकालिकात मागील शोधनिबंधांतील माहितीचा आढावा घेऊन लिहिण्यात आलेल्या संशोधन लेखात म्हटले आहे, की साडेसात लाख लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पंधरा प्रकारचे कर्करोग व व्यायाम- शारीरिक हालचाली यांचा संबंध यात तपासण्यात आला असता त्यात असे दिसून आले, की रोज अडीच ते पाच तास व्यायाम मध्यम हालचाली करणाऱ्या किंवा रोज १.२५ ते २.५ तास जोरदार हालचाली करणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग कमी असतो. मध्यम हालचालीसह व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये चरबीचे ज्वलन तीन ते सहा पट जास्त वेगाने होते. जे लोक बसून राहतात त्यांच्यात ही शक्यता फार कमी असते. जे लोक जास्त वेगाने हालचाली करतात त्यांच्यातही चरबीचे ज्वलन वेगाने होते, त्यामुळे त्यांच्यात कर्करोगाची शक्यता कमी होते. शारीरिक हालचाली व व्यायामामुळे आतडय़ाच्या कर्करोगाची शक्यता पुरुषात ८ टक्के कमी होते. स्तनाच्या कर्करोगाची शक्यता ६ ते १० टक्के, मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्यता ११ ते १७ टक्के, यकृताच्या कर्करोगाची शक्यता १८-२७ टक्के कमी होते.