आपल्या आवश्यकतेनुसार कर्ज घेणे यात नेहमीच काही वाईच असते असे नाही. वाढणाऱ्या संपत्तीसाठी घेतलेले विवेकपूर्ण कर्ज तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यास सहाय्यच करते. पण किंमत कमी होत असलेल्या मालमत्तेसाठी फार अधिक कर्ज घेतल्याने तुमचे नुकसानच होण्याची शक्यता असते. यामध्ये अनेकदा काही कळण्याआधीच तुम्ही आधीचे कर्ज पूर्ण करण्यासाठी दुसरे, नंतर त्यासाठी तिसरे असे कर्ज घेत सुटता. अशाने तुम्हाला परतफेड करणे तर जड जातेच, पण व्याजाचा भार सुद्धा फार वाढतो. अशा आर्थिक समस्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला काही उपाययोजना करून ठेवावी लागेल. खालील गोष्टींवरुन तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकता आहात हे दिसून येण्यास मदत होईल.

क्रेडिट कार्डावरील देणे योग्य वेळी पूर्ण न करणे

आजकाल कोणीही खिशात पैसे घेऊन फिरत नाही. कार्ड किंवा डिजिटल पैशाचे इतर प्रकार सोयीस्कर असून तुम्हाला कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर डिस्काउंट मिळवून देतात. क्रेडिट कार्डामुळे तुम्हाला आधी खरेदी करून त्याचे पैसे काही काळाने भरण्याची संधी मिळते आणि या कालावधीत त्यावर व्याज ही द्यावे लागत नाही. पण जर तुम्ही ठराविक तारखेपर्यंत पैसे भरले नाहीत, तर त्यावर साधारण ३५ टक्के वार्षिक व्याज द्यावे लागते. जर तुमच्याकडून असे वारंवार झाले, तर एक वेळ अशी येईल जेव्हा ही परतफेड तुमच्यासाठी अशक्य होऊन बसेल. त्यामुळे क्रेडिट कार्डांवरील खर्चावर नीट लक्ष ठेवा. आपले खर्च क्रेडिट कार्डाच्या मर्यादेच्या २० टक्के पर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वेळेवर परतफेड करा.

बँकांकडून कर्जाचा अर्ज फेटाळला जाणे

जर बँका तुमचा कर्जाचा अर्ज नाकारीत आहेत, तर असे असू शकते की तुम्ही आधीच कर्जबाजारी झालेले आहात. तुमच्या मिळकतीवरून आणि तुम्ही घेतलेल्या कर्जांवरून बँका तुमची परतफेड करण्याची क्षमता ठरवत असतात. जर तुम्ही लहान-सहान कारणांसाठी अनेक ठिकाणी कर्ज काढलेले असेल, तर तुम्ही तुमची कर्ज घेण्याची मर्यादा ओलांडलेली असू शकते, ज्यामुळे बँका नवीन कर्ज देण्यासाठी नकार देतात. तरीही निराश होऊ नका. तुम्ही आधीची सर्व देणी पूर्ण करून नंतर नवीन कर्जासाठी अर्ज करून अशा परिस्थितीवर मात करू शकता.

क्रेडिट स्कोअर खालावणे

वेळोवेळी आपला क्रेडिट स्कोअर तपासत राहा. ईएमआय अनियमित भरल्यामुळे, क्रेडिट कार्डावरील देणी अपुरी राहिल्यामुळे, कर्जाची परतफेड उशीरा केल्यामुळे किंवा कर्जासाठी अनेक अर्ज केल्यामुळे क्रेडिट स्कोअर सतत कमी होत असण्याची शक्यता असते. या सर्व कारणांमुळे तुमचा कर्जाचा प्रोफाइल बिघडत असतो. क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहिल्यास तुम्हाला कळू शकेल की तुमच्या खालावलेल्या स्कोअरचे कारण काय आहे. त्यावर उपाय करा. वेळेवर परतफेड करा आणि कर्जाची परफेड केली नाही असे करू नका. अशाने काही काळाने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारायला लागेल.

आधीचे कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज घेणे

जर तुम्ही आधी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी इतर कर्ज घेत असलात, तर तुमच्या वैयक्तिक अर्थकारणाची नौका बुडण्याची दाट शक्यता आहे. कर्ज फेडाण्यासाठी इतर कर्ज घेऊन तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकता आहात. अशाने तुम्ही आपल्या कर्जांची संख्या तर वाढवताच, तसेच तुमची परतफेड करण्याची क्षमता सुद्धा कमी होत जाते. परतफेडीचा हप्ता तुमच्या मासिक मिळकतीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी ठेवून तुम्ही यावर आळा घालू शकता.

अधिक कर्ज घेणे

हल्ली कर्ज घेणे अतिशय सोपे झालेले आहे. पण म्हणून प्रत्येक गरजेसाठी कर्ज घेणे शहाणपणाचे नाही. घर खरेदी करण्यासारख्या कारणासाठी घेतलेले कर्ज तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करते. पण सहलीसाठी कर्ज घेणे तुमच्या अर्थकारणासाठी बरे नाही. असे खर्च तुम्ही तुमच्या बचत किंवा मिळकतीतूनच भागवले पाहिजेत. गरजांसाठी खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही चैनीसाठी चादर न पाहाता पाय पसरलेत, तर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकलाच म्हणून समजा. अवास्तव खर्च करणे थांबवण्यासाठी तुम्ही मासिक खर्चांसाठी बजेट करायला सुरूवात केली पाहिजे.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार