नियमित व्यायामामुळे केवळ तुमचे शरीर सुडौल होते असे नाही, तर त्यामुळे तुमच्या आहारविषयक सवयीही सुधारतात, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबतचा अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये नियमित व्यायाम करीत नसलेल्या, तसेच आहाराचे नियमनही करीत नसलेल्या दोन हजार ६८० तरुण- प्रौढांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात सहभागी झालेल्या या व्यक्तींची प्रारंभीची जीवनशैली बहुतांश बैठी, शारीरिक हालचाली कमी असलेली होती. कित्येक आठवडे नियमित व्यायाम केल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा दिसून आली. ते आपल्या आहारात तुलनेत कमी स्निग्धांश असलेले मांस (जसे की चामडी सोसलेली कोंबडी, टर्की, स्निग्धांश कमी केलेले डुकराचे मांस), फळे आणि भाजीपाला यांचा समावेश करू लागले. सोडा, तळलेले पदार्थ यांसारख्या अनारोग्यदायी खाद्यपदार्थ- पेयांची त्यांची आवड कमी झाली, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींनी त्यांच्या आहारात कोणताही मोठा बदल करू नये, असे त्यांना बजावण्यात आले होते. पण हे बदल घडून आलेच. व्यायामामुळे हे बदल कसे घडून आले, या प्रक्रियेची या अभ्यासात तपासणी करण्यात आली नाही. मात्र योग्य प्रमाणात केलेल्या व्यायामामुळे शरीरात डोपामाईनच्या पातळीत बदल होऊन अति स्निग्धांश असलेल्या खाद्यपदार्थाची आवड कमी होते, असे यापूर्वी झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. भुकेचे नियंत्रण करणारी संप्रेरके आणि व्यायामाचे प्रमाण यांचा संबंध स्पष्ट करणारे अनेक अभ्यास याआधी झालेले आहेत. याबाबत अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे (ऑस्टिन) मॉली ब्राय यांनी सांगितले की, शारीरिक हालचालींच्या क्रियेमुळे आहारविषयक सवयींवरही परिणाम होऊ शकतो.