धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. त्यामुळे सहाजिकच अनेकांना त्यांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देता येत नाही. अनेक वेळा आपण बाहेरचे, उघड्यावरील तळलेले, मसालेदार पदार्थ खातो. मात्र या पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या शरीरावर तसंच त्वचेवरही परिणाम होत असतो. अनेकांना मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पुटकुळ्या, मुरुम,त्वचेतील आर्द्रता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे सहाजिकच अनेक जण महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करुन या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र सौंदर्य प्रसाधनांमध्ये बऱ्याच वेळा केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो.म्हणूनच कायम घरगुती उपाय केले पाहिजेत.

काही जण त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करतात. यात हळद-मधाचा लेप, काकडीचा रस, मुलतानाी माती, डाळीचं पीठ यांचा वापर करुन घरीच फेसपॅक तयार करतात. विशेष म्हणजे यांच्या व्यतिरिक्त तांदुळाच्या पीठापासूनदेखील घरच्या घरी फेसमास्क तयार करता येऊ शकतो.

तांदळाच्या पीठाच्या फेसमास्कचे फायदे –

१. सूर्यापासून निघणाऱ्य अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्याचे गुणधर्म तांदळामध्ये असतात.

२. तांदाळामध्ये अमिनो अॅसिड आणि व्हॅटामिन्स पुरेपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.

३. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

४. चेहऱ्यावरील डाग, मुरुम कमी होतात.

फेसमास्क करण्याची पद्धत –

साहित्य –
२ चमचे तांदुळाचं पीठ, १ चमचा मध, ३ चमचे गुलाबपाणी, १ चमचा बेसन

कृती –

एका भांड्यात तांदुळाचं पीठ घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी टाकून नीट मिक्स करुन घ्या. त्यानंतर यात बेसन टाका व पुन्हा एकदा हे मिश्रण नीट मिक्स करा. तयार झालेला हा लेप चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर हा लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा प्रयोग आठवड्यातून १ वेळा करा.