18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

गर्भधारणेदरम्यानचा ज्वर बाळास अपायकारक

गर्भधारणेच्या कालावधीत डॉक्टर कोणत्याही प्रकारचे औषधाचे सेवन करण्यास मज्जाव करतात.

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: October 13, 2017 1:13 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गर्भधारणेच्या पहिल्या तीन ते आठ आठवडय़ांदरम्यान मातेला ज्वर असल्यास होणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि हृद्यामध्ये विकृती निर्माण होऊ शकते असे एका अभ्यासादरम्यान आढळले आहे. पहिल्या त्रमासिकात मातेला ज्वर असल्यास बाळामध्ये हृद्यविकाराचा आणि चेहऱ्याची विकृती विकसित होण्याचा धोका अधिक असल्याचे संशोधकांना मागील काही दशकांपासून माहीत आहे. पण अशा प्रकारची विकृती रोगजंतू किंवा इतर संसर्ग स्रोतामुळे विकसित होते की केवळ ज्वरच याला कारणीभूत आहे. हा संशोधकांमध्ये वादाचा विषय होता. ‘सायन्स सिग्नलिंग’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पहिल्या त्रैमासिकात एसिटामिनोफेनचा योग्य वापर केल्यास जन्मजात विकृतींना काही प्रमाणात आळा घालता येऊ शकतो. गर्भधारणेच्या कालावधीत डॉक्टर कोणत्याही प्रकारचे औषधाचे सेवन करण्यास मज्जाव करतात. पण योग्य प्रमाणात एसिटामिनोफेनचा वापर केल्यास ज्वर उतरविण्यास मदत होते. तरीही महिलांनी डॉक्टरचा योग्य सल्ला घेऊनच त्याचे फायदे आणि धोके जाणून घ्यावेत असे अमेरिकेतील डय़ुक विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक एरिक बेन्नर यांनी सांगितले.

ज्वरामुळे गर्भावर कशा प्रकारचा प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी झेब्राफिश आणि कोंबडीच्या गर्भाचा अभ्यास केला. हृदय,चेहरा आणि जबडाच्या निर्माणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या न्यूरल क्रेस्ट पेशींमध्ये तापमान संवेदशील गुणधर्म असतात. या पेशींमुळेच आपल्या शरीराला तापमान कळते.

या अभ्यासादरम्यान संशोधकांनी टीआरपीव्ही-१ आणि टीआरपीव्ही-४ साठी कृत्रिम ज्वराची परिस्थिती निर्माण करून संशोधन केले. या वेळी गर्भाच्या चेहऱ्याच्या आणि हृदयामध्ये विकृती निर्माण होत असल्याचे आढळले. तरी अद्याप ज्वराची तीव्रता आणि कालावधीमुळे गर्भावर कोणत्या प्रकारचे परिणाम होतात याबाबत अस्पष्टता असल्याचे बेन्नर यांनी सांगितले.

First Published on October 13, 2017 1:13 am

Web Title: fever is harmful to baby during pregnancy