11 December 2017

News Flash

शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी इडली, डोसा उपयुक्त

नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 12:22 PM

दक्षिणात्य पदार्थ इडली, डोसा तयार करण्याच्या प्रक्रियेत पीठ आंबवले जाते, त्यामुळे सायट्रिक अॅसिडचे प्रमाण कमी होऊन जस्त आणि लोहांचे शोषण शरिरात गरजेप्रमाणे होण्यास मदत होते.

शरीराला क्षार, जीवनसत्त्वांसोबतचं खनिजांची देखील आवश्यकता असते. रोजच्या आहारातून आपल्याला ही पोषणमूल्ये मिळतात. शरीराच्या वाढीसाठी जीवनसत्त्वांसोबतच खनिजंही पोटात जाणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी मँगेनीज, पोटॅशिअम, लोह, जस्त यासारख्या खनिजांची आवश्यकता असते. पण ही खनिजं शरीरात शोषून घेण्याची क्षमता भारतीयांमध्ये कमी आहे. त्यामुळे इडली, डोसा, मोड आलेली कडधान्यं खनिजांचं शोषण करण्यासाठी आवश्यक ठरू शकतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

वाचा : जाणून घ्या ओव्याचे ५ फायदे

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च’च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनावर एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात यासंबधीची माहिती दिली आहे. भारतीय लोकांच्या आहारात मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी, बाजरी यासारखी तृणधान्यं आणि अनेक कडधान्यांचा समावेश असतो. त्यात असणाऱ्या फायटिक अॅसिडमुळे जस्त, लोह यांसारख्या खनिजांच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो. आहारामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे असली तरी फायटिक अॅसिडमुळे शरीरात योग्य त्या प्रमाणात ती शोषली जात नाहीत, असं संशोधक ए. एन गणेशमूर्ती, डी कालावैनान, बी. एल. मंजुनाथ यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

वाचा : चमकदार त्वचेसाठी खोबरेल तेलाचा ‘असा’ होईल फायदा

दक्षिणात्य पदार्थ इडली, डोसा तयार करण्याच्या प्रक्रियेत पीठ आंबवले जाते, त्यामुळे सायट्रिक अॅसिडचे प्रमाण कमी होऊन जस्त आणि लोहांचे शोषण शरीरात गरजेप्रमाणे होण्यास मदत होत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे मोड आलेली कडधान्यदेखील फायटिकचे प्रमाण कमी करून खनिजं शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवतात, असं म्हटलं आहे.

First Published on October 13, 2017 12:21 pm

Web Title: fight mineral deficiency idli dosa help research said