युद्धक्षेत्रातून परतलेल्या सैनिकांमध्ये शारीरिक श्रमांचा अभाव आणि रक्तात मत्स्यतेलाचे (फिश ऑइल) घटलेले प्रमाण यामुळे नैराश्याची भावना घर करू लागते. मत्स्यतेलाचे सेवन वाढवल्यास सैनिकांचा मूड चांगला राहण्यास मदत होते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे.

अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीतील संशोधक रिचर्ड क्रिडर आणि मेजर निकोलस बॅरिंजर यांनी १०० सैनिकांवर अभ्यास करून हे निष्कर्ष काढले. त्यानुसार शारीरिक श्रम, रक्तातील फिश ऑइल आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्सचे प्रमाण मूड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचे प्रमाण कमी झाल्यास माणूस निराश होतो. तर ते योग्य असल्यास उत्साही व प्रसन्न राहतो. सामान्य नागरिकांच्या तुलनेत सैनिकांना त्याची अधिक गरज भासते. कारण त्यांचे शारीरिक श्रम अधिक होतात. तसेच युद्धजन्य परिस्थितीत मनावर अधिक आघात होतात. ते भरून येण्यासाठी आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी फिश ऑइल आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

या अभ्यासादरम्यान संशोधकांनी विविध मानसिक अवस्थेतील सैनिकांच्या शरीरातील ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्सचे प्रमाण मोजले. जे सैनिक निराश होते, ज्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केले होते त्यांच्या शरीरात त्याचे प्रमाण कमी आढळले. तर निरोगी, उत्साही सैनिकांच्या शरीरात त्याचे प्रमाण अधिक आढळले.

सैनिकांचे मानसिक स्वास्थ्य हा सेनादलांसाठी गंभीर विषय असून त्यावर उपाय सापडले तर ते आनंददायीच ठरणार आहे, असे मेजर बॅरिंजर यांनी सांगितले. त्यातून पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या विकारांवर उपचार करणे सोपे जाणार आहे. तसेच निराश सैनिकांना पुन्हा उत्साहदायी जीवन जगण्याचे मार्ग मिळणार आहेत. युद्धाच्या भयाण संहारकतेला बळी पडलेल्या सैनिकांचे पुनर्वसन करण्यास या संशोधनाची मदत होणार आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)