अमेरिकेच्या अ‍ॅपल कंपनीने ‘वायरलेस फाइव्ह जी’ तंत्रज्ञानावर आधारित नवीन आयफोन मालिका बाजारात आणली आहे.

आयफोन १२चा पडदा ६.१ इंचाचा आहे. आयफोन ११ पेक्षा हा फोन हलका व कमी जाडीचा आहे. त्याची किंमत ७९९ डॉलर्स असून, आयफोन १२ मिनी या दुसऱ्या फोनची किंमत ६९९ डॉलर्स आहे. त्याचा पडदा ५.४ इंचाचा आहे. काळा, पांढरा, हिरवा, निळा या रंगात हे फोन उपलब्ध आहेत.

आयफोन १२ प्रोसुद्धा बाजारात दाखल झाला असून, त्यात अधिक शक्तिशाली कॅमेऱ्यांचा समावेश आहे. तो सिल्व्हर, ग्राफाइट, सोनेरी, निळा या रंगात उपलब्ध असून त्याची किंमत ९९९ डॉलर्स आहे. १२ प्रो मॅक्स फोनचा पडदा ६.७ इंचाचा असून त्याची किंमत १०९९ डॉलर्स आहे. या फोन संचात चार्जिग अ‍ॅडाप्टरचा समावेश न केल्याने ग्राहकांनी नाराजी दर्शवली आहे.

आयफोन १२, आयफोन १२ प्रो  २३ ऑक्टोबरला, तर  आयफोन १२  मिनी व आयफोन १२ प्रो मॅक्स हे १३ नोव्हेंबरला विक्रीस येणार आहेत.

होमपॉड स्पीकरचा आकार कमी करण्यात आला असून त्यात गुगल व अ‍ॅमेझॉन यांच्याशी स्पर्धेचा हेतू आहे. त्यांचे एको व नेस्ट हे स्पीकर्स बाजारात असून त्यांच्या किमती कमी आहेत. त्यांची किंमत ५० डॉलर्स आहे, तर आता होम पॉडची किंमत २९९ डॉलर्स आहे. अ‍ॅपलच्या नवीन होमपॉड मिनीची किंमत ९९ डॉलर्स ठेवण्यात आली आहे. त्यात अ‍ॅपलची म्युझिक सव्‍‌र्हिस अंतर्भूत आहे. त्यात पँडोराचाही समावेश आहे. अ‍ॅमेझॉन म्युझिकची सेवा येत्या काही महिन्यात त्यात घेतली जाईल. अ‍ॅपलने यात स्पॉटिफायचा समावेश केलेला नाही.

होमपॉड मिनी ६ नोव्हेंबरला विक्रीस येणार असून १६ नोव्हेंबरपासून त्याचा पुरवठा सुरू होईल. इमार्केटरच्या मते अमेरिकेत ५.८ कोटी लोक अ‍ॅमेझॉन एकोचा वापर करतात, तर २ कोटी ६५ लाख लोक गूगलचा नेस्ट स्पीकर वापरतात. १.५ कोटी लोक होमपॉड किंवा इतर स्पीकर वापरतात. त्यात सोनॉस व हरमॉन कारडॉन या कंपन्यांचा समावेश आहे.

आयफोन ११च्या किमतीत घट

आता भारतात आयफोन ११ च्या किमती कमी होणार असून त्या ५४,९०० ते ६९,९०० रुपयांपर्यंत असतील

किंमत किती? : आयफोन १२- ७९,९०० रुपये, आयफोन १२ मिनी -६९,९०० रु., आयफोन १२ प्रो- १,१९,९०० रु., आयफोन १२ प्रोमॅक्स – १,२९,९०० रु., होमपॅड मिनी- ९,९०० रुपये

या फोनमध्ये मॅगसेफ वायरलेस चार्जिग (प्रभारण) सुविधा दिली आहे. त्यात फोनच्या मागे काही चुंबकांचा वापर केला आहे. ही पोर्टलेस फोनच्या दिशेने जाणारी वाटचाल आहे.