भारत सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये ११८ चिनी मोबाईल अॅप बंद केले होते. या बंद केलेल्या अॅप्सच्या यादीत PUBG या गेमच्या अॅपचाही समावेश होता. यामध्ये PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite या दोन्ही अॅपचाही समावेश होता. यानंतर पबजी मोबाईलला गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं.

मात्र, आजपर्यंत हा गेम ज्या युजर्सने आधीच आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केला होता ते तो खेळू शकत होते. आता पबजी मोबाईलने जाहीर केलं आहे की हे अॅप आजपासून म्हणजेच ३० ऑक्टोबरपासून भारतात पूर्णपणे काम करणं बंद करेल. पबजी मोबाईलने आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं की, “३० ऑक्टोबर २०२० पासून Tencent games कडून भारतात सर्व युजर्ससाठी PUBG mobile Nordic Map Livik आणि PUBG moble lite या दोन्ही अॅपसाठी सर्व सुविधा आणि अॅक्सेस बंद केले जातील.”

पबजी मोबाईल अॅपच्या प्रकाशनाचे हक्क आधी टेन्सेंट गेम्सच्या जवळ होते. टेन्सेंट चिनी कंपनी होती. भारत सरकारच्या आदेशानंतर ब्ल्यू होल स्टुडिओने या कंपनीसोबत भारतात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर आता पबजी मोबाईलचे प्रकाशनाचे हक्क पुन्हा पबजी कॉर्पोरेशनला मिळतील. पबजी कॉर्पोरेशनने म्हटलं की, २ डिसेंबरपर्यंत हा गेम क्रॉफ्टन इंक सोबत जोडण्यात येईल.

लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले होते. तेव्हापासून चीन आणि भारतामध्ये सीमावादावरुन तणावाचे वातावरण आहे. या घटनेमुळे देशभरात नागरिकांकडून चीनविरोध उफाळून आला होता. त्यामुळे केंद्र सरकारने चीनच्या मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पबजीचा देखील समावेश आहे.