घराघरांत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या लसणातील घटक विविध रोगांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. लसणामध्ये आढळणारी संयुगे आणि फ्लोरिन यांचे मिश्रण हे रक्तातील गुठळ्या आणि कर्करोगाला आळा घालण्यासाठी परिणामकारक औषध म्हणून वापरले जाऊ शकतात, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. शतकांपासून लसणाचा वापर नैसर्गिक औषधी म्हणून करण्यात येत आहे.

लसणामध्ये आढळणारे घटक हे विविध रोग आणि आजारांविरोधात नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून कार्य करीत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. अमेरिकेतील अल्बानी विद्यापीठाच्या संशोधकांनी नैसर्गिकरीत्या लसणात आढळणाऱ्या घटकांमध्ये फ्लोरिनमिश्रित केल्यामुळे उपयुक्त जैविक प्रक्रियेत सुधारणा होत असल्याचा गृहितप्रमेय मांडला आहे. फ्लोरिन हे आवर्तसारणीमधील सर्वाधिक प्रतिक्रियाशील घटकांपैकी एक आहे.

गृहितप्रमेय सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी लसूण संयुगांमध्ये बदल करीत हायड्रोजन अणूऐवजी फ्लोरिन अणू वापरले. यानंतर फ्लोरिन सुधारित संयुगांची परिणामकारकता तपासण्यासाठी कोंबडीच्या अंडय़ांचा अभ्यास केला. यामध्ये फ्लोरिन सुधारित संयुगे आणि सुधारणा न केलेली संयुगे यांची तुलना करण्यात आली. यामधील अ‍ॅन्टी एजियोजेनेसिस घटकांचा वापर कर्करोगाला आळा घालण्यासाठी होत असून अ‍ॅँटीथ्रोबोटिक घटकांचा वापर रक्तात निर्माण होणाऱ्या गुठळ्या कमी करण्यास होतो.

संशोधनाअंती आढळलेल्या निकालांमध्ये सुधारित संयुगे हे जैविक प्रक्रियांमध्ये उत्तमरीत्या कार्यरत असून भविष्यात याचा विचार औषधोपचार पद्धतीच्या सुधारणेसाठी होऊ शकत असल्याचे समोर आले. फायदेशीर जैविक प्रक्रियेसाठी नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या लसूण संयुगांमध्ये सुधारणा करून औषधनिर्मिती केली जाऊ शकते असे पुरावे आमच्या संशोधनात आढळले असल्याचे अल्बानी विद्यापीठातील एरिक ब्लॉक यांनी सांगितले. हा अभ्यास मॉलेक्यूल्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.