मोबाईल नंबर पोर्ट करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल नंबर पोर्टेबलिटीसंदर्भात नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांनुसार आता मोबाईल नंबर दुसऱ्या ऑपरेटरवर पोर्ट करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

ट्रायनं मोबालईल नंबर पोर्टेबलिटी संदर्भात नवे नियम जारी केले आहे. नव्या नियमांनुसार एकाच सर्कलमध्ये मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी ५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. १६ डिसेंबरपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. यापूर्वी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागत होता.

सामान्य ग्राहकांच्या नंबर पोर्ट करण्यासोबतच ट्रायनं कॉर्पोरेट पोर्टिंगची सुविधाही सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सिंगल ऑथोरायझेशन लेटरद्वारे एका वेळी १०० मोबाईल नंबर पोर्ट करता येणार आहेत. यापूर्वी केवळ ५० मोबाईल नंबर पोर्ट करता येत होते.

अर्ज नाकारल्यास दंड
नव्या नियमांनुसार जर एखाद्या ऑपरेटरनं चुकून पोर्टिंग अर्ज नाकारला तर संबंधित ऑपरेटरकडून १० हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. पोर्टिंगची संपूर्ण प्रक्रिया ही त्याच सर्कलमध्ये तीन दिवसांच्या आत तर एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.

पोर्टेबलिटी म्हणजे काय ?
मोबाईल नंबर पोर्टेबलिटी म्हणजे ज्यामध्ये ग्राहकाचा नंबर न बदलता ऑपरेटर बदलण्याचा पर्याय. यासाठी ज्या मोबाईल ग्राहकाला आपला नंबर पोर्ट करायचा असेल त्याला एक युपीसी कोड जनरेट करावा लागतो. त्या कोडच्या आधारे मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यात येतो. सध्या यासाठी काही कंपन्या मोफत तर काही कंपन्या १९ रूपयांचे शुल्क आकारत आहेत. नव्या नियमांनुसार कंपन्यांना पोर्टिंगसाठी ५.७४ रूपये द्यावे लागणार आहेत.