हरयाणातील कर्नाल जिल्ह्यात उभारणी; आरोग्य विज्ञान क्षेत्रात संशोधन
कल्पना चावला आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे काम गतीने व्हावे, त्या अनुषंगाने विविध कामांवर देखरेख ठेवण्यासाठी हरयाणा सरकारने तीन समित्यांची घोषणा केली आहे.
अंतराळवीर दिवंगत कल्पना चावला हिच्या नावे कर्नाल जिल्ह्यातील कुटतल येथे या विद्यापीठाची उभारणी केली जात आहे. सरकारने जाहीर केलेल्या समित्यांमध्ये योजना मान्यता समिती, विद्यापीठाच्या आराखडय़ाचे मूल्यांकन करणारी समिती तसेच देखभाल समिती स्थापन करण्यात आल्याचे हरयाणा सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या उभारणीचा आराखडा मान्य करण्याबाबतच्या समितीचे प्रमुख हे वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील. वैद्यक परिषदेच्या नियमांनुसार इमारतीची रचना करण्याचे काम या समितीकडे असेल. तर प्रकल्पाचे मूल्यमापन करणारी समिती विद्यापीठासाठी पायाभूत सुविधा आवश्यक ती साधने उपलब्ध करून देईल. तर देखभाल समिती विद्यापीठाच्या उभारणीतील दैनंदिन कामाच्या देखभालीस जबाबदार असेल. त्यात बांधकामाची रचना, साहित्य खरेदी या बाबींचा समावेश असणार आहे.
आरोग्य क्षेत्रात संशोधनाचे मोलाचे काम उभे राहावे व सामान्यांना याचा लाभ व्हावा या हेतूने सरकार या विद्यापीठाची उभारणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वैद्यक क्षेत्रात देशातून चांगले संशोधक निर्माण व्हावेत हा या विद्यापीठाच्या उभारणीमागचा हेतू आहे.