आपली बदललेली जीवनशैली हेच स्थूलतेचं प्रमाण वाढण्याचं कारण आहे. त्यावर मात करायची असेल तर साधा, सकस आहार, जास्तीतजास्त हालचाली यावर भर द्यावाच लागेल. वजन कमी करण्यासाठी आमची अमुक-तमुक पेयं प्या आणि बारीक व्हा अशा बऱ्याच जाहिराती येतात. पण त्यात फार दम नाही, असं माझं मत आहे. त्यात हार्मोन्स वगरे असतील तर माहीत नाही. नेहमीचं खाणं खाऊन एक पेयं प्यायचं असेल तर त्याने बारीक व्हायची शक्यता नसते. आता वजन कमी करण्यासाठी अल्ट्रा साऊंड थेरपीही आली आहे. त्यात चरबी मोबीलाईज केली जाते. पण पुन्हा तुम्ही ती रोज जमाच करत राहणार असाल तर काय उपयोग? त्यामुळे यातला कोणताच उपाय तुम्हाला कायमस्वरूपी परिणाम देत नाही. तुम्ही तुमची जीवनशैली सुधारणं, खाण्यात बदल करणं यापेक्षा वजन आटोक्यात ठेवायचे दुसरे कोणतेही उपाय असू शकत नाहीत.

डाएटमध्ये जसं पारंपरिक डाएट असतं तसं हल्ली हाय प्रोटिन डाएटही केलं जातं. खरं तर मुख्यत: ज्यांना स्नायू बनवायचे असतात, ते खेळाडू हे हायप्रोटिन डाएट करतात. पण हे सगळं करताना आपण निसर्गापासून दूर जातो. कारण हाय प्रोटिन डाएटमध्ये मांसाहारावर जास्त भर असतो. पण माणसाची शरीररचना, दात, नखं, पचनसंस्था हे सगळं सतत मांस खाण्यासाठी नाहीच आहे. तुम्ही प्रोटिनसाठी जेवढं मांस खाल, तेवढे त्याचे इतरही दुष्परिणाम असतात. मांसामुळे विशेषत: मटण खाण्यामुळे त्याच्याबरोबर शरीरात कोलेस्टरॉलही जातं. चरबीही जाते. स्नायू वाढविण्यासाठी मर्यादेबाहेर मांसाहार करणं नसíगक आहे, असं मला वैयक्तिक पातळीवर अजिबात वाटत नाही. (यात धर्म वगरे मुद्दय़ाचा विचार केलेला नाही.) असा मांसाहार केला की त्याचा वेगळ्या पद्धतीने त्रास होणारच.

या सगळ्यापेक्षा उरळी कांचनसारखी जुनी केंद्रं आहेत, त्यांना प्राधान्य का देऊ नये, असं मी म्हणेन. तिथे तुमच्या खाण्यावर ठरावीक पद्धतीने नियंत्रण आणून तुमच्याकडून एक प्रकारे उपवास करून घेतला जातो. पण तिथे जाऊन तिथलं तंत्र समजून घेऊन ते रोजच्या जीवनात आचरण्याऐवजी तिथून पटकन वजन कमी करून आलेले लोक इथं आल्यावर पुन्हा हवं तसं खायला सुरुवात करतात आणि वजन परत वाढतं.

वजन कमी करण्यासाठीचा हा सगळा आटापिटा किती योग्य आहे, असाही प्रश्न आम्हाला विचारला जातो. पण गोष्ट अशी आहे की लोकांनी आधी खाणं-पिणं, राहणीमानाबाबत सगळ्या अनसíगक सवयी अंगिकारल्यामुळे त्यांना नॉर्मलला येण्यासाठी हे सगळं करावं लागतं. त्यापेक्षा जर आधीच मुलांना जंक फूड दिलं नाही, चॉकोलेट्सची सवय लावली नाही, त्यांना मदानी खेळ खेळायला प्रोत्साहन दिलं आणि त्यांना संगणक किंवा मोबाइलसमोर बसवून ठेवलं नाही तर ती स्थूल होणारच नाहीत. पण पालकच आधी हे सगळं करतात, त्याचं कौतुक करतात आणि मग दुष्परिणाम टाळण्याची वेळ येते.

ही गोष्ट खरी आहे की संगणक, बठं काम, यांत्रिकीकरण हे आता टाळता न येणारे टप्पे आहेत. पण मग म्हणूनच निदान खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी जागरूकता असली पाहिजे. आपल्याला कामं, हालचाली करताना जी आवश्यक ऊर्जा खर्चावी लागत होती, ती आता खर्चावी लागत नाही. कारण ती जागा यंत्रांनी घेतली आहे. असं असेल तर तेवढी ऊर्जा ग्रहण करणं कमी केलं पाहिजे. म्हणजे शरीरात अनावश्यक ऊर्जा जाणार नाही, चरबी साठणार नाही. म्हणजेच आहार कमी केला पाहिजे, योग्य तोच आहार घेतला पाहिजे. पण त्याचबरोबर लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आहारातून जे बाकीचे घटक मिळत असतात, ते आहार कमी केला म्हणून बंद होऊनही चालत नाही. तेही मिळायलाच हवेत. त्यासाठी म्हणून तुमचा जास्त भर हा फळांवर, सॅलड्सवर असला पाहिजे.

फळं, सॅलड्स खायचा सल्ला दिला की मग लोक असा युक्तिवाद करतात की मुळात फळं कशी खाणार, त्यांच्यावर हल्ली रसायनांचा मारा केलेला असतो, रसायनांचा भरपूर वापर करून फळं पिकवली जातात वगरे. पण मग त्यापुढचा मुद्दा असा आहे की मग म्हणून तुम्ही जंक फूड सतत खाणार का? त्यात चवीसाठी, रंगांसाठी मिसळल्या जाणाऱ्या रसायनांचं काय? त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांचं काय? दुसरीकडे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे फळांच्या बाबतीत कॅश क्रॉप म्हणता येतील अशा आंबा, सफरचंद, आणि आता काही प्रमाणात केळी यांच्यावर रंगासाठी रसायनांचा मारा केला जातो, असं म्हटलं जातं. पण पेरू, पपई अशा तुलनेत गरीब फळांच्या बाबतीत हा रसायनांचा मारा होण्याची शक्यता कमी आहे. कारण ही फळं कॅश क्रॉप नाहीत. मग अशी फळं खाता येऊ शकतात. त्यामुळे बर्गर खाण्यापेक्षा फळं खा. आणखी एक मुद्दा म्हणजे लवकर पिकण्यासाठी, रंगासाठी फळांवर प्रक्रिया केली जाते असं म्हटलं जातं. पण त्यांच्यात जास्तीची ऊर्जा तर कुणी इंजेक्ट करत नाही. जंक फूडमध्ये मात्र ती जास्तीची असते. फळांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं घातक आहेतच. जे अनसíगक आहे, ते घातक आहेच. मग ती रसायनं असोत, खाणं असो, जीवनशैली असो. कारण मानवी शरीर अजून त्याला सरावलेलं नाही. लाखभर वर्षांनंतर कदाचित ते सरावेल. कारण आपल्या जीवनशैलीची उत्क्रांती कितीही वेगवान असली तरी शरीराची उत्क्रांती अत्यंत संथ असते. त्या दोन्हीचा वेग जुळूच शकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

थोडक्यात काय तर, साधं अन्न खा, फळांवर भर द्या. कमी खा, भरपूर हालचाली करा. हे नीट, सडसडीत, आरोग्यपूर्ण राहण्याचं गमक आहे. पण असं सांगितलं की लोक लगेच विचारतात की मग मी पोहायला जाऊ का, की जिमला जाऊ, की एरोबिक्स करू वगरे. त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला जे सहज शक्य आहे, ते तरी आधी करा. पोहायला जाणार, मग पाण्यात क्लोरीन जास्त आहे, ट्रेनरला वेळ नाही अशा कारणांनी तो पूल कधीतरी बंद असणार, जिम सुरू केल्यावर न जायची हजार कारणं सापडणार. एरोबिक्सचा काही दिवसांनी कंटाळा येणार.. हे वेगवेगळे प्रकार करणं चांगलंच आहे, पण आधी गरजेच्या जेवढय़ा हालचाली असतात, तेवढय़ा तरी करा. त्यासाठी ते सोपं, सुटसुटीत असेल असेल असं बघा. रस्त्यावर चालण्यासाठी तुम्हाला कुणी अडवलंय? तुम्ही दिवसाला किती चालता? छोटी छोटी अंतरं बस, रिक्षा, स्वत:चं वाहन यांनी पार केली जातात. तेवढं अंतर सहज चालता येतं. कामावर जाताना किंवा येताना दोन-तीन स्टॉप आधी उतरलं किंवा चढलं तर तेवढं अंतर चालणं होतं. पण लोक म्हणतात, मला वेळ मिळत नाही, मी थकतो. पण करायचं ठरवलं तर हे अजिबात अवघड नाही. संगणक, इतर यंत्रांनी तुमची बरीच कामं आधीच सोपी केली आहेत. त्यातून वाचणारा वेळ थोडा तरी आपल्यासाठी वापरायला हवा.

तरुणाईला विळखा
संगणकीकरणाने आपल्याला एवढा विळखा घातला आहे की त्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात तरुणांमध्ये अकाली मृत्यू होण्याचं प्रमाण खूप मोठय़ा प्रमाणात वाढलेलं दिसणार आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह हे आता तरुणांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर दिसायला लागलं आहे. पूर्वी आम्ही या रोगांच्या शक्यतेचा विचार चाळिशीच्या पुढच्या रुग्णाच्या बाबतीत करायचो. आता पंचविशीच्या तरुणाच्या बाबतीतच या आजारांच्या शक्यतेचा विाचर करावा लागतो. खरं तर आणखी लहान म्हणजे १२-१३ वर्षांच्या रुग्णांच्या बाबतीतही काही केसेसमध्ये रक्तदाब, मधुमेह मिळायला लागला आहे. त्यातल्या बऱ्याच मुलांच्या बाबतीत नॉन्सेन्स खाणं हेच कारण असण्याची शक्यता आहे.

डॉ. माधव रेगे – response.lokprabha@expressindia.com

(शब्दांकन -वैशाली चिटणीस)

सौजन्य – लोकप्रभा