सतत क्रियाशील राहणे, आरोग्यदायी आहाराचे सेवन आणि रक्तदाबावर नियंत्रण यामुळे केवळ हृदयाचे आरोग्य अबाधित राहते असे नाही, तर मधुमेह होण्याचा धोकाही कमी होतो, असे संशोधकांना आढळले आहे.

‘डायबेटोलॉजिया’ या पत्रिकेत याविषयीचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी जी जीवनशैली आणि आरोग्याशी निगडित घटक कारणीभूत ठरतात, तेच मधुमेह टाळण्यासाठीही उपयुक्त आहेत, असे या अभ्यासकांना दिसून आले.

याबाबत अमेरिकेतील ओहिओ स्टेट विद्यापीठाचे क्रेग केन्ट यांनी सांगितले की, आपल्या रुग्णांना हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांसारखे गंभीर आजार-व्याधी होऊ नये यासाठी डॉक्टरांनी काय केले पाहिजे, याबाबतच्या माहितीत या अभ्यासामुळे चांगली भर पडली आहे.

संशोधकांच्या या पथकाने सात हजार ७५८ मधुमेहींची तपासणी केली. या गटातील व्यक्तींच्या हृदयाचे आरोग्य कसे आहे, हे ठरविण्यासाठी त्यांनी ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या ‘लाइफ सिम्पल-७’चा मार्गदर्शक म्हणून वापर केला. ‘लाइफ सिम्पल-७’नुसार हृदयाच्या आरोग्याचे आणि जीवनशैलीविषयक घटक म्हणून शारीरिक हालचाल-व्यायाम, आहार, वजन, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, रक्तशर्करा आणि तंबाखूचे सेवन आदी विचारात घेतले जाते. या चाचण्यांत सहभागी झालेले जे रुग्ण एकंदरीतच अशा सातपैकी किमान चार घटकांच्या बाबतीत योग्य मर्यादेत होते, त्यांना पुढील दहा वर्षे तरी मधुमेह होण्याची शक्यता ही ७० टक्क्यांनी कमी होती, असे दिसून आले.