नॅशनल हार्ट इन्स्टिटय़ूटच्या अभ्यासातील निष्कर्ष; तणाव कमी करण्यासाठी जनजागृती 

धूम्रपान तसेच धोकादायक पद्धतीने वजन कमी केल्यास हृदयविकार व संबंधित आजार होण्याचा धोका अधिक असतो, असा निष्कर्ष नॅशनल हार्ट इन्स्टिटय़ूटने अभ्यासाअंती काढला आहे.

त्यासाठी १ जून २०१२ ते १० ऑगस्ट २०१६ या कालावधीत १ लाख २० हजार ४४४ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत हृदयरुग्णांच्या संख्येत १० टक्के वाढ झाली आहे. त्यातही ४० वर्षांखालील रुग्णांमध्ये ही वाढ २८ टक्के आहे. तसेच रजोनिवृत्तीकडे झुकलेल्या महिलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित घटकांमुळे हृदयविकाराशी संबंधित व्याधींच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याला पोषक आहाराचा अभाव, ताणतणाव, कोणत्याही सल्ल्याशिवाय वजन कमी करण्याचे खूळ अशी कारणे सांगता येतील. या संस्थेच्या हृदयरोग सेवा विभागाचे प्रमुख विनोद शर्मा यांनी सांगितले.

जनजागृतीची गरज

गेल्या वर्षांत बदललेली जीवनशैली पाहता जनतेमध्ये याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच रोजच्या जगण्यातील ताण-तणाव कसे कमी करता येतील, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. तरुण व महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे या अभ्यासात उघड झाले आहे. त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी या दृष्टीने संस्थेतर्फे जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक आठवडय़ात दिल्लीतील एका शाळेला भेट देऊन माहिती दिली जाणार आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)