Honor कंपनी 10 ऑगस्ट रोजी Huawei Developers Conference 2019 मध्ये आपलं नवं उपकरण Honor Smart Screen लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा एकप्रकारचा स्मार्ट टीव्ही असणार आहे. या टीव्हीबाबत कमालीची उत्सुकता असल्याचं दिसत असून लाँचिंगपूर्वीच शानदार प्रतिसाद मिळतोय. लाँचिंगपूर्वीच या प्रोडक्टसाठी 1 लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी कंपनीने एक पोस्टर जारी केलं आहे. JD.com वर या टीव्हीसाठी बुकिंग सुरू असून दोन व्हेरिअंटमध्ये हा टीव्ही लाँच केला जाणार आहे. यातील एक स्टँडर्ड व्हेरिअंट आणि दुसरं प्रो व्हेरिअंट असेल. दोन्ही टीव्हीमध्ये स्मार्ट स्क्रीनसह 55 इंचाचं पॅनल असेल. Gizmochina ने याबाबतचं वृत्त दिलंय.

यात अत्याधुनिक आणि दमदार फीचर्सचा वापर करण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. यामध्ये कंपनीची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम HongMeng चा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. हा टीव्ही HongMeng ऑपरेटिंग सिस्टिमसह भारतात लाँच होणारं कंपनीचं पहिलंच उपकरण ठरेल. या स्मार्ट टीव्हीचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. यात Honghu 818 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे यात पॉप-अप कॅमेरा देखील असून हा कॅमेरा फोटो क्लिक करण्यासाठी किंवा व्हिडिओ कॉल करतेवेळी आपोआप बाहेर येईल. या टीव्हीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फेशियल रिकग्निशन हे फीचर देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Honghu 818 चिपसेटमुळे या टीव्हीत एचडीआर, सुपर रिझोल्यूशन (एसआर), नॉइज-रिडक्शन (एनआर), डायनॅमिक काँट्रास्ट इंम्प्रूव्हमेंट (डीसीआय), ऑटोमेटिक कलर मॅनेजमेंट (एसीएम) आणि मोशन एस्टिमेशन मोशन कम्पन्सेशन (एमईएमसी) टेक्नॉलजीच्या मदतीने उच्च दर्जाचे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव मिळेल. याशिवाय कंपनीच्या स्मार्टफोनसह येणाऱ्या Histen साउंड ऑप्टिमायजेशन टेक्नोलॉजीचा वापर देखील केला जाण्याची शक्यता आहे.