काजळ लावणे हा महिलांच्या मेकअपमधील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. मागच्या काही काळात हा ट्रेंड काहीसा मागे पडला. मात्र आता पुन्हा एकदा काजळ लावण्याची फॅशन आली आहे. काजळ लावल्याने डोळ्याचे सौंदर्य खुलून येते आणि डोळे जास्त उठावदार दिसत असल्याने तरुणींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांचीच याला पसंती असल्याचे दिसते. डोळ्यांना कोणतीही गोष्ट लावताना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. डोळ्याचे काजळ पसरत असल्याने अनेक मुली हैराण झालेल्या दिसतात. यामुळे काजळ लावल्यानंतर थोडा वेळाने डोळ्याखाली काळे डाग दिसतात. मग काय करावे हे अनेकींना कळत नाही. अशामुळे काजळ लावणेही टाळले जाते. मात्र हे काजळ दिवसभर जसेच्या तसे टिकवून ठेवायचे असेल तर काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.

– ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्या चेहऱ्यावरील मेकअप काही काळाने पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे मेक अप करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

-आपण लावत असलेले काजळ चांगल्या गुणवत्तेचे असेल याची काळजी घ्या. त्यातही ते वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या. हे काजळ स्थानिक ब्रँडचे असेल तर ते लगेच पसरते.

-आपल्या डोळ्याभोवती तेलकटपणा आहे असे वाटल्यास डोळ्यांभोवती कापसाने पुसून त्याठिकाणी पावडर लावा आणि त्यानंतरच काजळ लावा.

-काजळ योग्य पद्धतीने आणि पुरेसे लावल्यास ते पसरत नाही. मात्र खूप गडद काजळ लावल्यास ते नकळतपणे काही वेळाने डोळ्याच्या बाहेर येते.

– प्रत्येकाच्या डोळ्यांचा आकार लहान-मोठा असतो. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या आकारानुसार काजळ लावा.

– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना मेकअप काढून झोपा. याने उद्याचा मेकअप करण्यासाठी डोळे स्वच्छ राहतील.