चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या बहुतांश जणांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी पोटाचा वाढता घेर किंवा लठ्ठपणा हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरूष आणि महिला दोघांसाठी महत्त्वाची समस्या असणाऱ्या या लठ्ठपणावर मात करण्यासाठी मग वेगवेगळे उपाय अवलंबले जातात. आहारात केलेले बदल, जिमला जाणे, बाजारात मिळणारी सप्लिमेंटस वापरणे असे उपाय अवलंबले जातात. पण जीवनशैलीत काही ठराविक गोष्टींचा अवलंब केला तरीही वाढलेल्या कॅलरीज घटण्यास मदत होते. पाहूयात कोणत्या गोष्टीं केल्यास त्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतात…

व्यायाम करा

व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज जळण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातील ठराविक वेळ विशिष्ट व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना शरीरावर वाढलेली चरबी घटविण्यासाठी अशाप्रकारच्या व्यायामाची आवश्यकता असते. तुमचे स्नायू जितके कमजोर असतील तितकी तुम्हाला अधिक व्यायाम करण्याची आवश्यकता असते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

न्याहरी चुकवू नका

सकाळची न्याहरी करणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. अनेकदा कामाच्या गडबडीत किंवा ऑफीसला जाण्याच्या घाईत ती करणे राहून जाते. पण असे केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही खाण्यापेक्षा सकाळची न्याहरी सर्वात जास्त महत्त्वाची असते.

भरपूर चाला

चालणे हा शरीरात वाढलेल्या कॅलरीज घटविण्यासाठी एक उत्तम उपाय ठरतो. नियमित चालल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो आणि घामाद्वारे कॅलरीज शरीराबाहेर पडायला मदत होते. म्हणून नियमितपणे अर्धा तास चालणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. विशेष करुन रात्रीच्या जेवणानंतर रोज अर्धा तास चालणे खाल्लेले अन्न पचण्यास मदत करते, त्यामुळे नकळत कॅलरीज जळण्यास मदत होते.

पुरेसे पाणी प्या

शरीराचे सगळे कार्य सुरळीत चालण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. पाण्यामुळे रक्ताभिसरण तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते. शीतपेये पिणे म्हणजे शरीरात पाणी जाणे असे होत नाही, त्यामुळे पाणी कॅलरीज जळण्यासाठी आवश्यक असतात. यामुळे शरीरात तयार झालेल्या टॉक्सिन्सचा विनाश होण्यास मदत होते.

वेळेवर झोपा

रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी चांगले असते. तुम्ही रात्री वेळेत झोपल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे रात्री लवकर झोपावे. ‘लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे’ अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहे.