तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल आणि त्यासाठी तुमच्या मौल्यवान वस्तू तारण ठेवायच्या नसतील तर, तुमच्यासाठी पर्सनल लोन म्हणजेच व्यक्तिगत कर्ज हे एक उत्तम साधन आहे. व्यक्तिगत कर्जे असुरक्षित स्वरूपाची असतात. त्यांचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरीत प्रभाव पडणे टाळण्यासाठी ती जबाबदारीने हाताळावी लागतात. ईएमआय भरण्यात वरचेवर उशीर केल्याने व्याजाचे ओझे तर वाढेलच पण तुमचा क्रेडिट स्कोअरही खाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदाराची भविष्यातील कर्ज घेण्याची क्षमता कमी होते. तेव्हा, एखादे उत्पादन घेण्यापूर्वी तुमच्या पर्यायांचे मूल्यांकन करा. व्यक्तिगत कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही काही या गोष्टी लक्षात ठेवा.

कर्ज घेण्याचे निकष

तुम्ही किती रकमेच्या कर्जाला पात्र आहात हे काही विशिष्ट घटकांवर अवलंबून असते. तुमचे वय, कामाचा अनुभव, उत्पन्न, इतर कर्ज इत्यादी गोष्टी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तपासून पाहिले पाहिजे. तुम्ही जितक्या रकमेसाठी पात्र आहात त्याहून जास्त कर्जासाठी तुम्ही अर्ज केल्यास, ते नाकारले जाऊ शकते आणि त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल. तेव्हा कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, क्रेडिट एजन्सीद्वारे आपला क्रेडिट स्कोअर ऑनलाईन तपासा. सहसा, कर्जाची रक्कम ५० हजार ते ५० लाख असते. बँकेचे धोरण आणि पात्रता या निकषांवर हे अवलंबून असते. अर्जदाराच्या कर्जाच्या इतिहासानुसार व्याजदर ठरवला जातो.

कर्जाचा कालावधी

कर्जाचा कालावधी जास्त असल्यास तुम्हाला कमी ईएमआय भरावा लागू शकतो, परंतु दीर्घकालीन विचार करता त्यामुळे तुम्हाला व्याजही जास्त भरावे लागते. सहसा, व्यक्तिगत कर्जाचा अवधी १२ महिने ते ६० महिने असतो. व्यक्तिगत कर्जासाठी इतरही काही अल्पकालीन पर्याय आहेत. तेव्हा परतफेड कशी करणार आहात त्यानुसार तुम्ही उत्पादन निवडू शकता.

संबंधित शुल्क

व्यक्तिगत कर्जासाठी कर्जाच्या रकमेच्या १ ते २ टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाते आणि एखादी बँक प्रक्रिया शुल्काची खालची व वरची मर्यादा निश्चित करू शकते. याशिवाय, मुद्रांक शुल्क, दस्तऐवज तयार करण्याचे शुल्क यांसारखे काही खर्चही येतात. बँका आणि वित्तीय संस्थांना व्यक्तिगत कर्ज उत्पादनांमधून आकर्षक व्याज मिळत असल्यामुळे, त्या पूर्वप्रदानास प्रोत्साहन देत नाहीत. कर्जाच्या कोणत्या उत्पादनामध्ये सर्वात कमी पूर्वप्रदान/पूर्व-परिसमाप्ती शुल्क आहे ते पाहा. तसेच ज्या व्यक्तिगत कर्जाला तुलनेने कमी विलंब प्रदान शुल्क असेल ते निवडा.

सर्वात चांगल्या दराने कर्ज घ्या

सर्वात चांगल्या दराने कर्ज घेता यावे यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे देऊ केल्या जात असलेल्या व्याज दरांची तुलना करा. विविध बँकांच्या व्याज दरांमध्ये मोठा फरक असू शकतो. तुम्ही कदाचित फ्लॅट दर शोधत असाल, कारण त्यामध्ये भरल्या गेलेल्या प्रत्येक ईएमआयनुसार कमी झालेली शिल्लक विचारात घेतली जात नाही. तथापि, हे दर कार्डावर स्वस्त दिसतात. उदाहरणार्थ, दोन वर्षांच्या अवधीसाठी घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेसाठी वार्षिक १४ टक्के व्याजदर असेल तर, घटत्या शिलकीनुसार तुम्ही एकूण १५,२३० रुपये व्याज भरता. ज्यामुळे याचा फ्लॅट दर वार्षिक ७.६ टक्के होतो. जर तुम्ही ईएमआयद्वारे परतफेड करत असाल तर, घटत्या शिलकीनुसार व्याज मोजले जाते. व्यक्तीगत कर्जे अनेकदा आधीच मंजूर झालेली असतात आणि चटकन मिळतात. तथापि, कोणतेही कर्ज घेताना परतफेडीची योजना तयार ठेवा. व्यक्तिगत कर्जांवरील व्याज दर खूप जास्त असतात त्यामुळे जर ते घेण्याची तुम्हाला तातडीची निकड नसेल तर ते घेऊ नका.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार