वयाची पंचवीशी पार केली की हल्ली टक्कल पडायला सुरुवात होते. केस गळणे आणि त्यामुळे टक्कल पडणे हे सामान्य वाटत असले तरीही त्यामागे अनेक कारणे असतात. लहान वयात पडणारे टक्कल त्या व्यक्तीसाठी निश्चितच लाजवणारे असते. मग वेगवेगळ्या तेलांचा वापर नाहीतर आणखी काही उपाय करुन डोक्यावरचे केस वाचविण्याचे प्रयत्न केले जातात. पण त्यांचा विशेष उपयोग होईलच असे नाही. अनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजुने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पाहूयात यावर काय उपाय करावेत…

कांद्याचा रस

कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असते. सल्फरमुळे केस वाढण्यास मदत होते. मात्र यासाठी तुम्हाला पूर्ण एका कांद्याचा रस आवश्यक असतो. हा रस ज्याठिकाणी टक्कल पडायला सुरुवात झाली आहे त्याठिकाणी लावावा. त्यानंतर काही वेळाने कोमट पाण्याने हे धुवून टाका. हा प्रयोग २ ते ३ आठवडे करत राहा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हीटॅमिन ई असते. केसांच्या वाढीसाठी हे घटक अतिशय उपयुक्त असतात. हे तेल थोडेसे गरम करुन ज्याठिकाणचे केस गळतात तिथे लावा. हे तेल रात्री लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी केश शाम्पूने धुवा. असे वारंवार केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.

कापूर तेल

कापूरामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. मूळांची pH पातळी संतुलित राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अर्धा चमचा कापूर तेल, दोन चमचे दही आणि ३ ते ४ चमचे जोजोबा तेल एकत्र करावे. या मिश्रणाने टक्कल पडत असलेल्या ठिकाणी अर्धा तास मसाज करावा.

काळी मिरी

मूळांमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते आणि टक्कल पडायला लागते. काळी मिरी ही रक्ताभिसरणासाठी चांगली असते. काळ्या मिरीची पूड आणि लिंबाचा रस एकत्र करुन तो केसांच्या मूळांशी लावल्यास त्याचा फायदा होतो.

कोरफडीचा रस

कोरफडीचा रस केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगला असतो. हा ताजा रस काढून ४० ते ४५ मिनिटे केसांच्या मुळांशी लावावा. याचा केस वाढण्यास नक्कीच फायदा होतो.