News Flash

आंबे खरेदी करताय? हे नक्की वाचा

चांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या टीप्स

प्रातिनिधिक छायाचित्र

आंबा म्हणजे फळांचा राजा, त्याचा मधुर स्वाद, गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते. पिकलेल्या रसदार आंब्यात आणि त्यापूर्वीच्या त्याच्या कच्या कैरीच्या स्वरुपात पोषक अन्नघटकांची रेलचेल असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आंबा एकमेवाद्वितीय असतो. पण आजच्या जगात नीतिमत्ता पायदळी तुडवणे म्हणजे व्यावसायिक कसब मानले जाऊ लागले आहे. याच भावनेतून आंबे नैसर्गिकरीत्या पिकू देण्याऐवजी कृत्रिमरीत्या पिकवले जातात. आंबे पिकवण्याच्या कृत्रिम पद्धतीत कॅल्शियम कार्बाईडचा वापर, आंब्यातील कृत्रिम रंगांचा किंवा काही तीव्र रासायनिक पदार्थांचा फवारा मारून ते पिवळे बनवले जाण्याचे प्रकार होतात.

अन्न व औषध प्रशासनाकडून ठराविक बाजारातील आंबे व्यावसायिकावर कारवाई केल्याच्या बातम्याही आपण वाचतो. पारंपारिक पध्दतीने गवताची आढी घालून ४-५ दिवस ठेवून पिकवण्याऐवजी कृत्रिम पद्धतीत ते काही तासात पिकवले जातात. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे आरोग्यासाठी घातक असतात हे आपल्याला माहित आहेच. आता विशिष्ट आंबा कृत्रिमरित्या पिकवलेला आहे हे नेमके ओळखायचे कसे हे ग्राहक म्हणून प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे. पाहूयात यासंदर्भातील काही महत्त्वाच्या टीप्स…

१. कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा सुगंधित दरवळ, तो खातानाची चव आणि त्याच्या रसाचा स्वाद नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळांसारखा नसतो.

२. या आंब्याच्या सालीवर नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्याप्रमाणे सुरकुत्या येत नाहीत. ते चमकदार आणि गुळगुळीत दिसतात.

३. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे सर्व बाजूंनी समानरित्या पिवळेधमक दिसतात. यात नैसर्गिक आंब्याप्रमाणे सोनेरी, पिवळा, हिरवा, लाल अशा रंगांच्या छटा एकमेकात मिसळलेल्या नसतात.

४. हंगाम नसताना कुठलीही फळे खरेदी केली तर ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो एप्रिल अखेरीपर्यंत आंबे खरेदी करू नयेत.

५. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंब्याचा खरा हंगाम सुरू होतो. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात येणाऱ्या आंब्यांना भुलू नये.

कृत्रिम आंब्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

१. कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या आंब्यात अर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश राहतात. याचा परिणाम मेंदूवर होऊन डोक्यात जडपणा येणे, स्पर्शज्ञान आणि इतर संवेदनांमध्ये दोष निर्माण होतात.

२. आंबा पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक फवाऱ्यामध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (कार्सिनोजेनिक) असतात. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांना कर्करोग होऊ शकतो.

३. कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा नियमितपणे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या मूत्रपिंडात, यकृतात रसायनांमुळे बिघाड होऊन त्यांचे कार्य मंदावते.

४. कॅल्शियम कार्बाइडने फळे पिकवण्याचे काम करणाऱ्या मजूर वर्गात चक्कर येणे, मूड बदलणे, गोंधळल्यासारखे होणे, स्मृती कमी होणे असे असंख्य आजार आढळून आले आहेत.

५. गर्भवती स्त्रियांनी असा आंबा खाल्ल्यास कॅल्शियम कार्बाइड पचनसंस्थेद्वारे गर्भाशयात जाऊन बाळामध्ये जन्मजात विकृती निर्माण होऊ शकतात.

६. अशाप्रकारे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने उलटी, जुलाब, सतत मळमळणे, चक्कर येणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात.

डॉ. अविनाश भोंडवे

फॅमिली फिजिशियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 11:43 am

Web Title: how to take care while purchasing mango important tips
Next Stories
1 कर्करोगावरील नवे औषध मुलांसाठीही सुरक्षित
2 वयानुसार आहारात ‘हे’ बदल करा
3 …म्हणून ३ एप्रिल जगासाठी खास
Just Now!
X