इंटरनॅशनल बिझनेस मशीन म्हणजेच आयबीएम ही जगातील सर्वात मोठ्या संगणक तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. १९११ साली सुरु झालेली IBM आज १७० देशांमध्ये विस्तारली आहे. या कंपनीने त्यांच्या गेल्या १०८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार केला आहे. त्यांनी ‘रेट हॅट’ ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३४ अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये हा करार होणार आहे. हा करार IT सेक्टरमधील आजवरचा सर्वात मोठा करार म्हणून ओळखला जात आहे.

रेड हॅट ही ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रोडक्ट कंपनी आहे. ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमधील तज्ज्ञ कंपनी म्हणून ओळखली जाते. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. अनेक जण मायक्रोसॉफ्टला पर्याय म्हणून या सॉफ्टवेअरचा वापर करतात. तसेच गेल्या काही काळात रेड हॅटने Cold Storage Services या क्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे.

IBM ने गेल्या १०८ वर्षांत पारंपारिक पद्धतीने काम करणारी कंपनी म्हणून आपली ओळख जपली आहे. ही कंपनी संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर तयार करते. आपल्या उच्च दर्जाच्या साधनांमुळे १९व्या शतकात IBM ने संगणक बाजारात आपली मक्तेदारी निर्माण केली होती. परंतु जागतिकीकरणानंतर HP, Xerox, Accenture, Oracle, SalesForce यांसारख्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या एकहाती सत्तेला आव्हान देण्यास सुरुवात केली. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी बाजारात नव्या दमाने उतरण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी त्यांनी थेट रेड हॅट कंपनीला विकत घेण्याची तयारी केली आहे.  रेट हॅटच्या मदतीने त्यांना संगणक तंत्रज्ञानातील भविष्य मानले जाणाऱ्या Cold Storage Services वर मक्तेदारी निर्माण करायची आहे, असा दावा काही संगणक तज्ज्ञांनी केला आहे.