व्यायामासाठी वेळ काढणे हा सगळ्यात अवघड वाटणारा विषय असतो. सोमवारपासून किंवा एक तारखेपासून नक्की व्यायाम करणार असे अनेक जण म्हणतात पण ही १ तारीख आणि सोमवार कधीच येत नाही. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते हे आपल्याला माहित असते मात्र तशी कृती आपल्याकडून होत नाही. ऑफीसच्या वेळा, घरातील कामे आणि इतर अनेक कारणे आपण व्यायाम टाळण्यासाठी कायमच देत असतो. पण अशी कारणे देत तुम्ही मागच्या ६ वर्षांपासून व्यायाम केला नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. यामुळे तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यता असते. मात्र जे लोक किमान काही शारीरिक हालचाली करतात त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.

अमेरिकेतील जॉन होपकीन्स विद्यापीठात याविषयीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी ११,३५१ जणांच्या जीवनशैलीची नोंद घेण्यात आली. यात ६० वर्षाच्या लोकांचा जवळपास १९ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, आठवड्याला किमान जास्त तीव्रतेचा व्यायाम ७५ मिनिटे तर मध्यम तीव्रतेचा व्यायाम १५० मिनिटे करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे व्यायामाचे प्रमाण वाढवणाऱ्यांमध्ये हृदय बंद पडण्याचे प्रमाण जवळपास १२ टक्क्यांनी कमी होत जाते असा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. हृदविकाराचा झटका, हृदयाच्या रक्तवाहिन्या मृत होतात, हृदय दिर्घ काळासाठी बंद पडणे, दिर्घकाळासाठी उद्भवणारे हृदयाचे विकार अशा समस्या उद्भवतात. ६० ते ६५ वर्षांच्या वरील व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण, सिगारेट ओढणे आणि कुटुंबातील इतिहास ही कारणे प्रामुख्याने दिसून येतात.