नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर झाली आहे सुरुवात संकल्प करण्याची आणि ते मोडले जाण्याची. हो म्हणजे अनेकांनी या वर्षीही नेहमीप्रमाणे काही वाईट सवयी सोडण्याचे किंवा चांगल्या सवयी लावून घेण्याचे संकल्प केले असतील. मग अगदी धुम्रपान सोडण्याचा संकल्प असो किंवा वजन कमी करण्याचा संकल्प असो अनेकजण अनेक संकल्प करतात. मात्र तुम्हाला खरोखरच स्वत:मध्ये बदल घडवायचा असला आणि एखादा संकल्प अंमलात आणायचा असला तर जानेवारीऐवजी तुम्ही मार्च महिन्यामध्ये सुरुवात करायला हवी असं मानशास्रज्ञांचं म्हणणं आहे.

सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित कला आणि विज्ञान विषयातील मानसशास्राचा अभ्यास करणारे सहाय्यक मुख्याध्यापक असणाऱ्या टीम बोनो यांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे. “संकल्प करण्यासाठी एक जानेवारी हा योग्य काळ आहे हा समज आपण आता दूर करायला हवा. उलट एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये बदल होण्यासाठी जानेवारी हा सर्वात चुकीचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही मॉर्निंग वॉकला जाण्याचा संकल्प केला तर थंडी असल्याने तुम्ही कंटाळा करण्याची शक्यता जास्त असते,” असं बोनो सांगतात.

तसेच “जानेवारीमध्ये अनेकजण हे नाताळ आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यांनंतर पुन्हा आपले दैनंदिन आयुष्य सुरु करतात. त्यामुळे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात,” असंही बोनो सांगतात. “सुट्टीनंतर पुन्हा आठवडाभर काम करायला कंटाळा येतो किंवा मोठ्या सुट्टीनंतर पुन्हा ऑफिसला जायला कंटाळवाणे वाटते तसंच हे आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमची अपेक्षा पुर्ण करणाऱ्या गोष्टी या आनंददायी असतात. मानसोपचार शास्रामधील अनेक संशोधनांमध्ये सुट्ट्यांऐवजी त्या सुट्ट्यांमध्ये काय करणार याचे नियोजन करुन याबद्दलचा विचार जास्त मानसिक आनंद देणार ठरतो हे सिद्ध झालं आहे. मात्र वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये दिर्घकालीन नियोजन करण्यासाठी प्रोत्साहन देणारी कोणतीच गोष्ट घडत नसते. त्यामुळेच जेव्हा एखादी व्यक्ती भाविष्याकडे पाहते आणि भविष्यात पाहण्यासारखे किंवा नियोजन करुन ठेवलेलं काहीच नसतं त्यावेळी मानसिक मरगळ येते. त्यामुळेच अशा कालावधीमध्ये एखादी नवीन गोष्ट सुरु करण्यात अडचणी येतात,” असं बोनो म्हणाले.

अमेरिकेमधील हे संशोधन उष्ण प्रदेशातील लोकांना लागू होत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात असंच म्हणावं लागेल. “सूर्यप्रकाशाचा आपल्या शरिरावर किती परिणाम होतो हे जाणवत नाही. जानेवारी महिन्यामध्ये दिवस आकाराने लहान असल्याने या काळामध्ये सुर्यप्रकाश कमी असतो. सुर्यप्रकाशामुळे शरिरामधील मज्जातंतूशी संबंधित प्रक्रियांवर सकारात्मक परिणाम होतो. ज्याचा थेट संबंध मानसिक परिस्थितीशी असतो. अनेकजण सुर्योदयापूर्वीच ऑफिसला जातात आणि सुर्यास्तानंतर ऑफिसमधून निघतात. अशाप्रकारे कमी प्रमाणात सुर्यप्रकाश मिळाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर आणि शारिरातील ऊर्जेवर होतो,” असं बोनो यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळेच तुम्ही अजून संकल्प केला नसेल तर तो काही महिने पुढे ढकलून मार्च महिन्यापासून आपल्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करु शकता असंच या संशोधनाचा अर्थ काढता येईल.