भारतीय पुरूषांमधील धुम्रपानाचे प्रमाण गेल्या तीन दशकांमध्ये घटले आहे. मात्र, चिंतेची एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय महिलांच्या धुम्रपाणाच्या प्रमाणात कोणता ही बदल झाला नसल्याचे एका जागतिक अभ्यासाने सिध्द केले आहे. या अभ्यासावरून जगामध्ये अमेरिका सोडल्यास भारतीय महिला धुम्रपानामध्ये पुढे आहेत.
वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रीक्स अँण्ड इव्हॅल्यूएशन(आयएचएमइ) संस्थेने केलेल्या अभ्यासामधून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. या अभ्यासानुसार १९८० मध्ये ३३.८ टक्के भारतीय पुरूष धुम्रपान करत होते. हा अकडा कमी होत २०१२ मध्ये २३ टक्के पुरूष धुम्रपान करत असल्याचा दावा या नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासामधून करण्यात आला आहे.
दुसरीकडे २०१२ मध्ये महिलांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण ३.२ टक्के होते व तेच प्रमाण १९८० मध्ये असल्याचे हा अभ्यास म्हणतो.      
या टक्केवारी नुसार भारतामध्ये २०१२ मध्ये साधारण १.२ कोटी महिला धुम्रपान करत असल्याचे आढळले.  पुरूषांबाबतचा हाच आकडा ९ कोटी आहे. १८७ देशांमधील धुम्रपानाच्या प्रमाणावर या अभ्यासामुळे प्रकाश टाकण्यात आला असून, बुधवार, ८ जानेवारीला अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या नियतकालीकामध्ये तंबाखू या विषेश अंकामध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे.
भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो लोक धुम्रपानामुळे मृत्यूमुखी पडत असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे’ अध्यक्ष डॉ. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले.