रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारी व त्यावर लक्ष ठेवणारी नाण्याच्या आकाराची गरजेप्रमाणे इन्सुलिन पुरवणारी पट्टी ‘स्मार्ट इन्सुलिन पॅच’ नावाने संशोधकांनी विकसित केली आहे. मधुमेहात रक्तशर्करेचे नियमन करणे आवश्यक असते त्यामुळे ही पट्टी मधुमेही रुग्णांना वरदान ठरणार आहे. इन्सुलिनचा आवश्यक तेवढाच डोस म्हणजे मात्रा देण्यासाठी त्याचा वापर होईल.

नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग या नियतकालिकात म्हटले आहे की, ही पट्टी नाण्याच्या आकाराची असून तिचे उत्पादन करणेही सोपे आहे. ती दिवसातून एकदाच वापरता येईल. अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले असून संशोधकांनी असे म्हटले आहे की, इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडात असते. ते शरीरातील ग्लुकोज शर्करेचे नियमन करीत असते. ग्लुकोज हे अन्नातून मिळणारे ऊर्जादायी रसायन आहे.

टाइप १ मधुमेहात व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन नैसर्गिकरित्या तयार होत नाही, तर टाइप २ मधुमेहात स्वादुपिंडातून मिळालेल्या इन्सुलिनचा वापर शरीरात योग्यप्रकारे होत नाही. हे दोन्ही प्रकार मिळून मधुमेहाचे एकूण ४० कोटी रुग्ण जगात आहेत. यात मधुमेही रुग्णांचे आरोग्य सुधारणे हा आमचा हेतू आहे. या स्मार्ट पट्टीच्या मदतीने रक्तातील शर्करेचा अंदाज घेऊन नंतर इन्सुलिनची मात्रा सोडली जाईल. स्वादुपिंडही नैसर्गिक पातळीवर गरजेप्रमाणे इन्सुलिन सोडत असते. तीच क्रिया ही पट्टी करणार आहे. या पट्टीच्या मदतीने ग्लुकोजचे प्रमाण मोजले जाईल व त्यानंतर सूक्ष्म सुयातून इन्सुलिनची मात्रा दिली जाईल. या सुया एक मिलिमीटर लांबीच्या असतील. रक्त शर्करेचे प्रमाण सुधारल्यानंतर औषधाची मात्रा कमी केली जाईल. कमी ग्लुकोजमुळे अनेकदा कोमात जाण्याचा किंवा मृत्यूचा धोका असतो. स्मार्ट इन्सुलिन पट्टीने सर्व धोके टाळले जाणार आहेत. यातील सुयांमध्ये ग्लुकोज संवेदक असून तो पॉलिमरचा बनवलेला आहे.