चहा हा जसा अनेकांसाठी अमृततुल्य असतो, तसंच काहींसाठी कॉफी आहे. कॉलेजच्या कट्ट्यावर मज्जामस्ती करताना हीच कॉफी साथ देते. तर अनेकदा उगाच एकटं रहावंसं वाटलं तर हीच कॉफी अनेकांची साथीदार होते. त्यामुळे कॉफी लव्हर्ससाठी कॉफीचं महत्त्व शब्दांत मांडता येणार नाही. कॉफी हे श्रीमंतांचे पेय आहे असं म्हटलं जातं. मात्र, कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आज International Coffee Day च्या निमित्ताने कॉफी पिण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. यकृताचे कार्य सुरळीत होण्यास मदत –

कॉफी पिणं यकृतासाठी फायदेशीर ठरतं. कॉफीमुळे यकृताचा सिरोसिस होण्याची शक्यता कमी असते. रोज १ कप कॉफी प्यायल्यास ही शक्यता २२ टक्क्यांनी कमी होते तर २ कप कॉफी प्यायल्यास ४३ टक्के कमी होते.

२. ऊर्जा टिकून राहण्यास मदत –

सकाळी व्यायाम करण्यापूर्वी कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. यामुळे तुम्हाला व्यायाम करताना थकवा आल्यासारखे वाटत नाही. कॅफीनमुळेही तुम्ही ताजेतवाने राहण्यास मदत होते.

३. वयस्कर लोकांमध्ये हृदयाची क्रिया सुधारण्यास मदत –

चहा-कॉफी पिणे आरोग्यासाठी वाईट असते असे म्हटले जाते. मात्र वयस्कर लोकांमध्ये हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास कॉफी उपयुक्त ठरते असे जर्मनीमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. कार्डिओव्हस्क्युलर सेल्स खराब होऊ नयेत म्हणून कॉफीची मोठी चळवळही सुरु करण्यात आली होती.

४. टाईप २ डायबेटीस होण्याची शक्यता कमी होते –

डेन्मार्क येथे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कॉफीच्या सेवनाने टाईप २ डायबेटीस होण्याची शक्यता कमी असते. कॉफीमध्ये कॅफेनशिवाय असणारे घटक यामध्ये उपयुक्त ठरतात.