श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रत केली जातात. रिमझिम पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन, म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो.

कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. एखाद्या लहान बाळाप्रमाणे कृष्णमूर्तीला आंघोळ घालून त्याच्यासमोर भक्तीगीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रात्री १२ वजता हा कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

यावर्षी अष्टमी २३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून नऊ मिनिटांनी सुरू होणार आहे. आणि २४ तारखेला सकाळी आठ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहणार आहे.

मोठमोठय़ा शहरांत अन्य देवालयातसुद्धा जन्मोत्सव करण्याची वहिवाट आहे.  रात्री कीर्तन, मंत्रश्रवण, भजन, पुराण वगरे यथासंभव कार्यक्रम करावा. या दिवशी कोकणात बालगोपाल मंडळी नाचत नाचत, वाद्य्ो वाजवीत तोंडाने ‘‘गोिवदा आलाऽरेऽऽ आला’’ किंवा नुसते ‘‘गोिवदा ऽऽगोपाळा’’ अशी गाणी म्हणत गावभर फिरून शेवटी श्रीनारायणाच्या देवालयात जाऊन दर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात. श्रावण वद्य नवमीला ‘दहीकाला’ असे म्हणायची प्रथा आहे.  या दिवशी नाचणाऱ्या बाळगोपाळांच्या अंगावर ताक, दही, कढत पाणी व थंड पाणी ओतण्याची पद्धत आहे.  सर्व गावात नाचून झाल्यावर ही मुले शेवटी श्रीनारायणाच्या देवालयात येऊन तेथील दहीहंडी फोडण्यात येते.  त्यावेळी कोठे कोठे भुईमुगाच्या शेंगा उडविण्याची प्रथा आहे. मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येतो.  बाहेरगावचे पुष्कळ लोक मुद्दाम या ठिकाणी श्रीकृष्णजन्मोत्सव पाहण्याकरिता जातात.