रिलायन्स जिओने गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एक नवीन अ‍ॅप JioMeet लाँच केलं. हे अ‍ॅप लाँच झाल्यापासून चर्चेत आहे. JioMeet म्हणजे लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Zoom ला भारतीय पर्याय असल्याची चर्चा आहे. अशातच आता निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही JioMeet अ‍ॅपचं कौतुक केलं असून हे अ‍ॅप ‘झूम’पेक्षा उत्तम असल्याचं म्हटलंय.

“JioMeet अ‍ॅप वापरुन पाहिलं. हे वापरायला एकदम सहज आणि सोपं आहे…झूमपेक्षा हे अ‍ॅप उत्तम आहे”, असं अमिताभ कांत म्हणाले. ट्विटरद्वारे याबाबत माहिती देताना अमिताभ कांत यांनी  JioMeet चे फीचर्सही सांगितले. “यात मिटिंग्स एनक्रिप्टेड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असतात. अमर्यादित एचडी कॉल्स करता येतात…सर्व डेटाही भारतातच राहतो. भारतातील या नव्या अ‍ॅपमुळे आता या क्षेत्रात खळबळ माजेल…”, अशा आशयाचं ट्विट कांत यांनी केलं आहे.

JioMeet चे फीचर्स :-
JioMeet हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झालं असून हेव पूर्णतः मोफत आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे 100 पेक्षा जास्त जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येतो. JioMeet अ‍ॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करतं. जिओमीट अ‍ॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करण्यापासून, स्क्रीन शेअर करण्यासारखे अनेक फीचर्स आहेत. डेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही JioMeet चा वापर करु शकतात. लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे JioMeet हा अजून एक पर्याय युजर्सकडे आला असून याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय असलेल्या झूम अ‍ॅपला थेट टक्कर मिळेल.