व्हॉट्सअॅप हा आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मेसेजिंगसाठी वापरले जाणारे हे अॅप खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मेसेजबरोबरच व्हिडियो, फोटो आणि तर कधी काही महत्त्वाची कागदपत्रे एकमेकांना पाठवण्यासाठी हे अॅप्लिकेशन सर्रास वापरले जाते. कधी वाढदिवसाच्या शुभेच्छा तर कधी एखाद्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठीही या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. हा दिवस आपल्याला लक्षात ठेवावा लागतो आणि त्या दिवशी मेसेज करावा लागतो. पण आता हे काम काहीसे सोपे होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे आता तुम्हाला व्हॉटस अॅपला पाठवायचा मेसेज तुम्हाला शेड्यूल करता येणार आहे. सध्या ही सुविधा अँड्रॉईड वापरणाऱ्यांसाठी असेल असे सांगण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप आहेत ज्यामध्ये तुम्हाला अशाप्रकारे विशिष्ट वेळ आणि दिवसासाठी मेसेज शेड्यूल करता येणार आहे.

आता हे शेड्यूलिंग कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर काही अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून हे शेड्यूलिंग करता येणार आहे. यामध्ये केवळ मेसेजच नाही तर फोटो आणि व्हिडियोही शेड्यूल करता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट विसरण्याची शक्यता कित्येक पटींनी कमी होणार आहे. आता हे कसे शेड्यूल करायचे ते पाहूया…

१. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप शेड्यूलर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.

२. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर त्याठिकाणी उजव्या बाजूला ‘+’ चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.

३. आता व्हॉटसअॅपवरील एखादा कॉन्टॅक्ट किंवा एखादा ग्रुप निवडा.

४. त्यानंतर तारीख आणि वेळ निवडा आणि किती फ्रिक्वेन्सीने हा मेसेज पाठवायचा आहे तेही निवडा.

५. मग मेसेज टाईप करुन Create बटणावर क्लिक करुन तुम्ही मेसेज शेड्यूल करु शकता.