झोप अपुरी झाल्यास आपल्या स्मृती बळकट करण्यास मदत करणाऱ्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी अपुऱ्या झोपेचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो का, हे अभ्यासण्यासाठी उंदरावर प्रयोग केले. झोपेमुळे मेंदूतील पेशी कार्यक्षम होऊन त्याचा शिकण्यासाठी आणि स्मृती साठवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे प्राणी एखादा धडा सहज शिकतात आणि त्याबाबतची माहिती मेंदूमध्ये साठवून ठेवतात, असे संशोधकांना या अभ्यासामध्ये आढळून आले.

अपुरी झोप, झोपेचे विकार आणि झोप येण्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेण्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून, बुद्धीच्या आकलनक्षमतेवर याचा मोठा परिणाम होत असल्याची माहिती या वेळी संशोधकांना मिळाली.

उंदीर आणि मानवी मेंदू मोठय़ा प्रमाणात स्मृती लक्षात ठेवू शकतो. त्यासाठी प्रथम त्याच्या आकलनक्षमतेचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे ग्राहम डिरिंग यांनी म्हटले आहे.  झोपेमध्ये मेंदूतील स्मृती पुन्हा जागृत होण्यास मदत करतात. पुरेशी झोप घेण्यामुळे या स्मृती अधिक बळकट होतात. आणि त्यामुळे शिकवण्यात आलेल्या अनेक गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. मात्र सध्या अनेक कारणांमुळे अपुरी झोप होते, त्यामुळे मेंदूतील स्मृती जागृत होण्यास अडथळा निर्माण होतो. याचा स्मृती लक्षात राहण्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी या वेळी सांगितले. हे संशोधन ‘सायन्स’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.