जागतिक आरोग्य संघटनेनं १६८ देशांमध्ये पाहणी केली असून कुठला देश सगळ्यात जास्त उत्साही व कार्यक्षम आहे आणि कुठला देश आळशी आहे याची वर्गवारी केली आहे. सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा या देशानं पहिलं स्थान मिळवलं आहे तर या यादीत तळाला म्हणजे सगळ्यात आळशी या स्थानावर कुवेत हा देश विराजमान झाला आहे.

उत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका १४३व्या स्थानावर, इंग्लंड १२३व्या, सिंगापूर १२६व्या तर ऑस्ट्रेलिया ९७व्या स्थानावर आहे. कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया व इराकमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलं आहे. तर युंगाडामधले फक्त ५.५ टक्के जनता पुरेशी कार्यप्रवण नाहीये.

उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७व्या स्थानावर असून फिलिपाइन्स १४१व्या तर ब्राझिल १६४व्या स्थानी आहे. दर आठवड्याला शरीराला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम घडत असेल तर तो पुरेसा व्यायाम शरीरासाठी आहे असा संघटनेचा निकष आहे.

बहुतेस सगळ्या देशांमध्ये पुरूषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा शारीरिक मेहनत करत असल्याचे आढळले आहे. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. कामाचं बैठं स्वरूप व वाहनांवर असलेलं कमालीचं अवलंबित्व यामुळे श्रीमंत देशांमधल्या नागरिकांचा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये शारीरिक व्यायामाच्या पातळ्यांमध्ये फारसा बदल झालेला नसल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या देशांनी, लोकांनी व्यायाम करावा, शारीरिक कष्टांचं प्रमाण वाढवावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.