चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लसने एक ‘मेड इन इंडिया’ युनिव्हर्सल सर्च फीचर OnePlus Scout लाँच केलं आहे. कंपनीने हे फीचर हैदराबादच्या R&D सेंटरमध्ये डेव्हलप केलं आहे. सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू असून गुगल प्ले-स्टोअरवरुन बीटा व्हर्जन डाउनलोड करता येईल. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युजर्सच्या फिडबॅकच्या आधारे येत्या काही आठवड्यांमध्ये हे फीचर सर्व भारतीय युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

काय आहे OnePlus Scout? –
युजर्सना फोनमध्ये काहीही एका क्लिकवर सहजपणे शोधता (सर्च) यावे यासाठी कंपनीने हे फीचर आणलं आहे. याद्वारे आता युजर्स थेट app drawer मधून सर्च करु शकणार आहेत. आतापर्यंत सर्च करण्यासाठी युजर्सना तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा क्लिक करावे लागत होते. पण आता या फीचरद्वारे एकाच क्लिकमध्ये फाइल्स, कॉन्टॅक्ट्स, डॉक्युमेंट्स, म्युझिक, सिनेमा, निअरबाय लोकेशन्स, सर्व्हिस इ. सर्च करता येईल. वनप्लस स्काउट फीचरशिवाय कंपनी भारतीय युजर्ससाठी अनेक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये वर्क लाइफ बॅलेन्स, एसएमएस कॅटेगराइजेशन आणि OxygenOS 11 यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

वनप्लसचा ‘स्वस्त’ नॉर्ड –
दरम्यान, कंपनीने गेल्या महिन्यातच कंपनीने आपला ‘मिड-रेंज सेगमेंट’मधील फोन वनप्लस नॉर्ड लाँच केला आहे. OnePlus Nord मध्ये सेल्फीसाठी 32+8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स 616 सेन्सर आहे. तर, फोनच्या मागील बाजूला 48MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. 48MP प्राइमरी कॅमेऱ्याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. ब्लू मार्बल आणि ग्रे ऑक्सी या दोन कलर्सचे पर्याय या फोनसाठी आहेत. ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असलेला OnePlus Nord अँड्रॉइड 10 वर आधारित OxygenOS 10.5 वर कार्यरत आहे. यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंत रॅम आहे. 184 ग्रॅम इतकं या फोनचं वजन असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,115mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. OnePlus Nord च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत भारतीय बाजारपेठेत 24 हजार 999 इतकी आहे. तर, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27 हजार 999 रूपये आणि 29 हजार 999 रूपये इतकी आहे.