डॉ.अमोल देशमुख

सध्या करोनाजन्य परिस्थितीमुळे सगळीकडे निराशेचे वातावरण आहे. सरकार, यंत्रणा, नागरिक तसेच सततचे तणावाच्या वातावरणात काम करून, सततच्या होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यामध्येही काही प्रमाणात हतबलता, निराशा दिसून येत आहे. अशाही परिस्थितीत आशेचा किरण असतोच आणि हा आशावाद आपल्याला स्वत:मध्ये आणि इतरांमध्ये निर्माण करावा लागेल. लोकांनी अशा काळी आशावादी राहणे हे त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. आशावाद आपल्याला प्रेरणा तर देतोच, परिस्थितीशी सामना करण्याची ऊर्जाही देतो. आशावादामध्ये जगाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आहे. आशावादी दृष्टिकोन ठेवताना स्वत:ला स्थिर ठेवून स्वत:मधले सामथ्र्य आणि उणिवा एक व्यक्ती म्हणून लक्षात घ्यायला हव्यात.

मनातील नकारात्मक स्वगताला आव्हान देऊन निराशावादी विचारांना सकारात्मकतेने बदलून, लोक या कठीण काळात अधिक आशावादी कसे व्हायचे ते शिकू शकतात. आशावादी लोक त्यांच्यासोबत चांगल्या घटना घडतील, अशी अपेक्षा करतात. हे करत असताना वास्तवाची जाण आणि भान ठेवतात. तसेच परिस्थितीतला धोका लक्षात घेऊन सातत्याने वागणुकीत बदल करावे लागतात. (उदा.: मास्क घालणे, एकमेकांत अंतर ठेवणे)

अशी व्यक्ती विपरीत घटना आणि झालेले नुकसान तात्पुरते म्हणून पाहातो. तसेच अपयशाचा सामना करून बाऊंस बॅक करतात. आशावादींना जेव्हा एखाद्या क्षेत्रात अपयश येते, तेव्हा ते त्यांच्या क्षमतांविषयीच्या त्यांच्या विश्वासावर परिणाम होऊ  देत नाहीत.

अशा बिकट परिस्थितीचा सामना करताना असाहाय्य होण्याऐवजी निराशेवर मात करून आशावादी दृष्टिकोन ठेवणारे यास आव्हान म्हणून सोडवतात. निराशावादी माणसाप्रमाणेच आयुष्य आशावादी व्यक्तीवर त्याच अडचणी व दुर्घटना आणते; परंतु आशावादी त्यांना योग्य रीतीने हाताळतात. आशावादी व्यक्ती परिस्थितीचा धैर्याने सामना करून स्वत:ची सहनसिद्धी वाढवतात. हा दृष्टिकोन स्वत:सोबत इतरांच्या भावनांचा, अस्तित्वाचा विचार करून स्वहितासोबत परहित राखण्यास प्रोत्साहित  करतो. म्हणजेच या काळात मी स्वत:ची घेतलेली काळजी माझ्यासोबत इतरांचीही निगा राखत आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच अशा परिस्थितीत अंगीभूत लवचीकपणा ठेवला तर परिस्थितीला सामोरे जाणे सोपे जाईल.

आपण अशी कौशल्ये शिकू शकतो, जी आपल्याला आशावादी व्यक्ती बनण्यास मदत करेल. कितीही निराशावादी व्यक्ती हे कौशल्य शिकण्यास सुरुवात करू शकतो. आपण स्वयंचलित नकारात्मक विचारांना आव्हान देऊन प्रारंभ केल्यास आपण समस्या उकलाचा दृष्टिकोन शिकू शकतो. आपण मिळालेल्या माहितीला, घटनांना काहीही मनाला पटेल तसा अर्थ न लावता, योग्य अर्थ लावून, स्वत:च्या नियंत्रणातील घटकांवर लक्ष केंद्रित करून, वेळोवेळी समस्येवर पर्यायांची उकल काढून, स्वत:वर आणि इतरांवर शिक्कामोर्तब न करता, कधीकधी आलेले अपयश पचवून, स्वत:ला, परिस्थितीला स्वीकारून, सध्याच्या परिस्थितीला साजेसे प्राधान्यक्रम लावून आपण सर्व या परिस्थितीचा सामना ताकदीने करू शकतो.

कृतज्ञता, गरजूंना मदत करण्याची तळमळ आणि स्वत:च्या नकारात्मक स्वगतावर विजय मिळवण्याचे कौशल्य आशावादी व्यक्तीचे वेगळेपण दाखवते. ते छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेतात, आपल्या अपेक्षा कमी ठेवतात, सकारात्मकतेबद्दल नेहमी विचार करतात, वास्तववादी असतात, स्वत: इतरांसाठी रोल मॉडेल असतात, सर्जनशील असतात, ध्यानधारणेचा सराव करतात, जगण्याचे कारण त्यांच्याकडे असते. आशावादी दृष्टिकोन व्यक्तीला ‘समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन’ जगण्यास शिकवते, जो सध्याच्या परिस्थितीत सर्वानी अंगीकारणे गरजेचा आहे.