करोना व्हायरस महामारीमुळे देशात 17 मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्राला मोठा फटका बसलाय. पण आता सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने देशातील आपल्या 600 डीलरशीप पुन्हा सुरू केल्या असून गेल्या काही दिवसांमध्ये 50 पेक्षा अधिक गाड्यांची विक्रीही कंपनीकडून करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने लॉकडाउनदरम्यान कार विक्रीसाठी खास सेवाही सुरू केली आहे. बुधवारी कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली.

‘सध्या देशात 600 डीलरशिपमध्ये कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच, आधीपासून बूक केलेल्या जवळपास 55 गाड्यांची डिलिव्हरीही ग्राहकांना करण्यात आली आहे’, अशी माहिती बुधवारी कंपनीकडून देण्यात आली. देशभरात मारुतीच्या एकूण 3,080 डीलरशिप आहेत. त्यापैकी 474 अ‍ॅरेना ऑउटलेट्स, 80 नेक्सा शोरूम आणि 45 कमर्शियल व्हेइकल ऑउटलेट्समध्ये कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.

नवी सेवा –
लॉकडाउनमध्ये कार विक्रीसाठी आता कंपनीने होम डिलिव्हरीची नवी सेवा आणली आहे. यानुसार, ग्राहक आता थेट मारुतीच्या अधिकृत वेबसाइटवरुन त्यांची आवडती कार बूक करु शकतात. त्यानंतर जवळच्या डीलरशिपद्वारे कारची थेट घरपोच डिलिव्हरी मिळेल. कार बूक करतानाची सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. कारच्या विविध अ‍ॅक्सेसरीज आणि अन्य पार्ट्सही ऑनलाइन मागवता येणार आहेत. कंपनीच्या marutisuzuki.com आणि nexaexperience.com या दोन संकेतस्थळांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या गाड्यांचं उत्पादन देखील पुन्हा सुरू करणार आहे. कंपनी हरयाणाच्या मानेसर येथील कारखान्यामध्ये 12 मे पासून प्रोडक्शन घेण्यास पुन्हा सुरूवात करणार आहे.