सध्या भारतीय ग्राहक नवीन कार खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा अधिक विचार करतायेत. अशातच काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीची S-Presso ही गाडी Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर टाटा मोटर्सने त्यांना टोमणा मारत एक ट्विट केलं होतं. ‘इथे सुरक्षिततेसोबत तडजोड केली जाऊ शकत नाही’, असं ट्विट टाटाने नाव न घेता केलं होतं.

टाटा मोटर्सने Tata Motors Cars या अकाउंटवरुन ‘ड्रायव्हिग एक मस्ती आहे , पण जेव्हा तुमच्या सुरक्षेची पूर्ण खात्री असेल तेव्हाच’, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. या कॅप्शनसोबत टाटा मोटर्सने एक फोटोही पोस्ट केला होता. त्यात एक तुटलेला कॉफी मग होता. त्यावर आम्ही इतक्या सहज तुटत नाही असं लिहिलं होतं.

आता मारुती सुझुकीनेही एक ट्विट केलं आहे. मारुतीच्या या ट्विटकडे टाटा मोटर्सला प्रत्युत्तर म्हणून बघितलं जात आहे. ‘आम्ही देशातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाइल ब्रँड आहोत, आणि हा दावा निर्विवाद आहे’, असं ट्विट मारुतीने केलंय. या ट्विटमध्ये मारुतीनेही कोणाचं थेट नाव घेतलेलं नाही, पण मारुतीचं हे ट्विट टाटाला प्रत्युत्तर मानलं जातंय. यासोबतच, मारुती सुझुकीने आपल्या ट्विटमध्ये, ‘आम्ही तुमच्या मनातील आमचं स्थान अजून बळकट करण्यासाठी समर्पित आहोत’, असंही नमूद केलंय.


यापूर्वी टाटा मोटर्सने Hyundai कंपनीची Grand i10 ही कार सुरक्षेच्या टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर त्यांच्यावरही निशाणा साधला होता. ‘तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर खूश होऊ शकतात…काही गोष्टी केवळ कागदावरच ग्रँड आहेत… सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित टियागोसोबत ड्रायव्हिंगची मजा घ्या, कारण या कारला ग्लोबल सेफ्टीमध्ये 4 स्टार मिळालेत’ असं टाटाने म्हटलं होतं.

गेल्या काही वर्षांमध्ये टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या बाजारात आपलं स्थान बळकट केलंय. टाटा टियागो, हॅरियरनंतर आता Altroz कारद्वारे टाटा मोटर्स वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. सेफ्टीमध्ये Tata Altroz कारला 5 स्टार मिळालेत. यासोबतच या कारला आपल्या सेगमेंटमधील भारतातील सर्वात सेफ कारचा टॅग मिळाला आहे. पण, अजूनही भारताच्या अर्ध्याहून जास्त कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीचीच मक्तेदारी आहे.