मायक्रोसॉफ्ट ही टेक्नॉलॉजी कंपनी कायम नवनवीन बाबतीत प्रगती करत आघाडीवर असते. आता कंपनीने भारतीयांसाठी आणि विशेषत: मराठीजनांसाठी एक खास गोष्ट केली आहे. मायक्रॉसॉफ्टने इ-मेल आयडीसाठी १५ भारतीय भाषांची निवड केली आहे. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश असून येत्या काळात त्यामुळे तुमचा मेलआयडी निर्णाण करायचा असेल तर मराठीसारख्या स्थानिक भाषेचाही वापर करता येणार आहे. आतापर्यंत आपण मेलआयडी केवळ इंग्रजीमध्ये निर्माण करु शकत होतो. पण मायक्रोसॉफ्टने उचललेल्या सकारात्मक पाऊलामुळे आता भारतीयांना आपल्या स्थानिक भाषेत मेल आयडी तयार करता येणार आहेत.

ही सुविधा युजर्सना ऑफीस ३६५, आऊटलूक २०१६, आऊटलूक डॉट कॉम, एक्सचेंज ऑनलाइन, एक्सचेंज ऑनलाइन प्रोटेक्शन यांसारखी अॅप्लिकेशनवर वापरता येणार आहे. आऊटलूक वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा उत्तम पर्याय ठरेल. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टने ही घोषणा केली असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अँड्रॉईड आणि अॅपलच्या आऊटलूक अॅप्लिकेशनमध्ये युजर्सना भारतीयांना आपल्या मातृभाषेतील मेल पाठवता आणि स्विकारता येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद जास्तीत जास्त सोपा करण्याच्यादृष्टीने इ-मेल आयडी १५ भारतीय भाषांमध्ये करता येणा हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे, असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अधिकारी मितुल पटेल यांनी सांगितले. लोकांना तंत्रज्ञानाची भाषा शिकावी लागण्यापेक्षा तंत्रज्ञानाने लोकांची भाषा शिकावी असा आमचा प्रयत्न आहे असेही पटेल यांनी सांगितले. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात हिंदी, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मराठी, नेपाळी, सिंधी, बंगाली, गुजराती, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश असेल. याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच ती वापरासाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.