अस्थमा आजाराबाबत नागरीकांमध्ये न्यूनगंड आणि अनेक गरसमज आहेत हे गरसमज दूर करणे गरजेचे आहे. अस्थमा असल्याचे लक्षात येताच घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. इन्हेलेशन थेरपीच्या माध्यमातून आपण अस्थमावर मात करता येते, असे अलिबाग येथील डॉ. केतकी धुमाळ यांनी सांगितले . अस्थमा दिनाच्या पाश्र्वभूमीवर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. धुमाळ यांनी सांगितले की, मी दररोज किमान १०-१५ अशा रुग्णांना भेटते की,ज्यांच्याशी आजाराबाबत नव्हे तर औषधे घेण्यात खंड न पडू देण्याबाबत सल्लामसलत करावी लागते. अस्थमाशी निगडित औषधे नियमितपणे घेत राहण्याबाबत आपल्याकडे लोक अतिशय निष्काळजी आहेत. औषधांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण तब्बल ७० टक्के एवढे गंभीर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले . डॉ. धुमाळ म्हणाल्या की, अस्थमा हा एक जुनाट हट्टी विकार आहे ज्यासाठी दीर्घकाळपर्यंत उपचार घेणे गरजेचे असते. अनेक रुग्ण जरा बरे वाटले की,आपली इन्हेलर तसेच औषधे घेणे बंद करतात. हे धोकादायक ठरू शकते. कारण औषधांत खंड पडणे म्हणजेच रुग्णांना तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणाऱ्या गोष्टीत खंड पडणे. जो निर्णय धोकादायक ठरू शकतो. तो परस्पर घेण्याऐवजी रुग्णांनी इन्हेलर बंद करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे केव्हाही चांगले, असेही डॉ. धुमाळ म्हणाल्या. रुग्णांनी इन्हेलरचा उपयोग बंद करण्यामागे अनेक कारणे असतात. औषधांवर होणारा खर्च वाचवणे, त्याच्या साईड इफेक्ट्सपासून मुक्तता मिळविणे आदी बिनबुडाच्या कारणांच्या जोडीला इन्हेलर उपकरणाबाबत असलेले गरसमज आणि सामाजिक न्युनगंड ही देखील महत्वाची कारणे आहेत. अनेकजण हा आजार लपवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तो अधिक बळावतो. त्याखेरीज आरोग्यसुरक्षा व्यावसायिकाबाबत असमाधान, अपेक्षा, आपल्या परस्थितीबाबत असलेला संताप, परिस्थितीला कमी लेखणे, आरोग्याबाबत बेफिकिरी असणे असे काही मानसिक अडथळे देखील असतात, असे डॉ. धुमाळ यांनी स्पष्ट केले.