बुद्धिमत्तेशी संबंधित असलेली किमान पाचशे जनुके वैज्ञानिकांनी शोधून काढली असून यात दोन लाख चाळीस हजार व्यक्तींच्या जनुकातील फरकांचा अभ्यास करण्यात आला.

‘मॉलिक्युलर सायकिअ‍ॅट्री’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात विविध प्रकारच्या लोकांच्या बुद्धिमत्तेत फरक का असतो याचाही उलगडा झाला आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ, ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठ व साउथ हम्पटन विद्यापीठ यांच्या वैज्ञानिकांनी बुद्धिात्ता क्षमतेशी निगडित ५३८ जनुके शोधली असून त्यांना मानवी जनुकीय आराखडय़ात १८७ भाग हे बुद्धिमत्ता कौशल्याशी निगडित असल्याचे दिसून आले आहे. जी जनुके बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत, त्यांचा इतर जैविक प्रक्रियांवरही परिणाम होत असतो. यातील काही जनुके दीर्घायुष्याशी निगडितही आहेत. जी जनुके कूटप्रश्न सोडवण्याच्या क्षमतेशी निगडित आहेत त्यांचा संबंध न्यूरॉन्समधील परस्पर संदेशवहनात असतो. एडिंबर्ग विद्यापीठाचे डेव्हिड हील यांनी सांगितले की, आमचा अभ्यास हा बुद्धिमत्तेशी निगडित अनेक जनुकांवर आधारित आहे. माणसाच्या बुध्दिमत्तेत फरक करणाऱ्या जैविक प्रक्रिया यातून शोधून काढता येतील. आजूबाजूच्या परिस्थितीचा जनुकांवर परिणाम होत असतो, त्यामुळे लोकांच्या बुद्धिमत्तेत फरक पडतो असे त्याचे सध्याचे उत्तर आहे, असे आयन डिअरी यांनी सांगितले. बुद्धिमत्तेवर जनुकांचा परिणाम जसा यात दिसून येतो तसेच बुद्धिमत्ता व इतर आरोग्य यांचाही संबंध असतो हे यातून स्पष्ट होत आहे.