मुंबईमध्ये पहिल्यांदाच ‘द इट इंडिया कंपनी’तर्फे कौटुंबिक खाद्य जत्रेचं आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ आणि १३ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर ही खाद्य जत्रा भरणार आहे. विविध चवीच्या आणि प्रदेशातल्या खाद्यपदार्थांची लोकांना ओळख व्हावी आणि खाद्यप्रेमी एकत्र यावेत हा या खाद्यजत्रेमागचा मुख्य उद्देश आहे.
या खाद्य जत्रेमध्ये सोशल, मोती महल डिलक्स, नील, मारूश, द बेकर्स डझन, मॅगनम, कन्ट्री ऑफ ओरिजिन, बेल्जिअन वॉफल, टेरटूलिआ, वॉव पॉपकॉर्न, बास्किन रॉबिन्स, मामागोटो, द मंकी बार, मॅड ओव्हर डोनट्स, कोंकण कॅफे, फॅट्टी बाओ, जस डिव्हाइन आणि द बॉम्बे फूड ट्रक हे प्रसिध्द फूड ब्रॅन्ड पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. त्याचप्रमाणे ‘द ललित फूड ट्रक’ आपल्या पहिल्या फूड ट्रकचे येथे अनावरण करणार आहेत.
‘लाइव्ह पॉप-अप किचन’ हे खाद्य जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य असेल. ग्रेशम फर्नांडिस आणि शेफ विनोद सिंग यांसारखे नावाजलेले शेफ येथे खवय्यांसाठी विविध पदार्थ प्रत्यक्ष करून दाखवणार आहेत. त्याप्रमाणे भारतातील सर्वात तरूण दहा शेफही येथे आपली पाककला सादर करतील. ‘चीझ कसे तयार करावे?’ याचा मास्टरक्लासही येथे रविवारी असणार आहे.
ही कौटुंबिक खाद्य जत्रा असल्याने लहान मुलांसाठीही विविध गोष्टींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खेळण्याच्या जागा, हस्तकला आणि चित्रकला कार्यशाळा, संगीताचे कार्यक्रम, पुस्तक वाचन, चॉकलेट बनवण्याच्या वर्गांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे पाच वर्षांसाखील मुलांना येथे मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वयोवृध्द मंडळींसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.