एक एप्रिल 2020 पासून भारतात वाहनांच्या इंजिनसाठी ‘बीएस 6’ निकष लागू झाल्यापासून ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपले अनेक मॉडेल्स बंद केले आहेत. आता Nissan कंपनीनेही भारतीय बाजारातील प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही Terrano ही गाडी आपल्या अधिकृत वेबसाइटवरुन हटवली आहे. त्यामुळे कंपनीने भारतीय मार्केटमधून ही एसयूव्ही बंद केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Terrano च्या विक्रीत झालेली घट आणि बीएस-6 इंजिनमध्ये अपडेट करण्यासाठी लागणारी मोठी गुंतवणूक यामुळे कंपनीने ही एसयूव्ही बंद केल्याचं सांगितलं जात आहे. Nissan कंपनीने ही गाडी भारतीय बाजारात सर्वप्रथम 2013 मध्ये लॉन्च केली होती. यानंतर 2017 मध्ये ही एसयूव्ही अपग्रेड करुन बाजारात पुन्हा उतरवण्यात आली. Terrano बंद केली असली तरी कंपनी लवकरच बीएस-6 इंजिनसह किक्स लॉन्च करणार आहे. यात नवीन टर्बो-पेट्रोल इंजिन मिळेल. हे किक्सच्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल इंजिन असू शकते. याशिवाय, कंपनी नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करण्याचीही शक्यता आहे. निसान मॅग्नाइट नावाने ही कार लॉन्च केली जाईल आणि याची बेसिक किंमत 5.25 लाख रुपयांच्या जवळपास असू शकते.

Renault Duster च्या प्लॅटफॉर्मवर आधारित Terrano दोन इंजिन प्रकारांमध्ये यायची. यात 1.6-लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनचा समावेश होता. पेट्रोल इंजिन 103bhp ची ऊर्जा आणि 148Nm टॉर्क निर्माण करायचे. तर, डिझेल इंजिन 84bhp आणि 109bhp अशा दोन पॉवर आउटपुटमध्ये उपलब्ध होते.