नोकियाचे स्मार्टफोन बनविणाऱ्या एचएमडी ग्लोबलने गेल्या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन आणि दोन फीचर फोन लाँच केले. कंपनीने Nokia C3, Nokia 125, Nokia 150 आणि Nokia 5.3 हे चार फोन आणले. यातील Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन आहेत. तर, नोकिया सी3 आणि नोकिया 5.3 स्मार्टफोन आहेत. दोन्ही फीचर फोनच्या विक्रीसाठी आधीच सुरूवात झाली आहे. तर, Nokia 5.3 हा स्मार्टफोन आज (दि.1) पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन (Nokia.com) हा फोन खरेदी करु शकतात.  यामध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर, क्वॉड रिअर कॅमेरा आणि 4,000mAh ची बॅटरी यांसारखे पीचर्स आहेत. याशिवाय सेल्फीसाठी नॉच कॅमेरा मिळेल.

Nokia 5.3 स्पेसिफिकेशन्स :-
हा फोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यामध्ये क्वॉलकॉम ऑक्टाकोर स्नॅपड्रैगन 665 प्रोसेसर आहे. नोकियाच्या या फोनमध्ये 6.55 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. Nokia 5.3 फोनमध्ये 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल, शिवाय मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, एफएम रेडिओ, युएसबी टाइप सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. तसेच, फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरीही आहे. ही बॅटरी 22 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 18 तास स्टँडबाय टाइम देते असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय यात रिअर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि गुगल असिस्टंटसाठी डेडिकेडेट बटण दिलं आहे.

Nokia 5.3 किंमत :-
Nokia 5.3 च्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे.