फेसबुक हे सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम आहे. इन्स्टाग्राम या फोटोशेअरिंग अॅपलाही तितकीच पसंती मिळताना दिसत आहे. या दोन्ही ठिकाणी युजर्स त्यातूनही तरूण युजर्स आपला सर्वाधिक वेळ व्यतित करतात. पण काहीजण ठराविक मर्यादेहून अधिक काळ या माध्यमाचा वापर करतात. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम हे अनेकांसाठी व्यसन ठरलं आहे.

पण आता फेसबुकनं नवं फीचर आणलं आहे ज्यामुळे युजर्सनां आपण फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर किती वेळ व्यतित केला याची माहिती मिळणार आहे. ‘युअर टाईम ऑन फेसबुक’ आणि ‘युअर अॅक्टिव्हिटी’ या पर्यायावर क्लिक केल्यास फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपण किती वेळ घालवला हे युजर्सनां कळणार आहे. फेसबुक हे मोठं व्यासपीठ आहे. जगभरातले कोट्यवधी लोक या माध्यमामुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत.

या माध्यमाचा फायदा आहे. मात्र या माध्यमांशी जोडल्या गेलेल्या युजर्सनां याचा त्रास होऊ नये यासाठी फेसबुकनं टाइमलिमिट घालून दिली आहे. या टाइम लिमिटमुळे युजर्स एका ठराविक वेळेपर्यंतच फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ऑनलाइन राहू शकतील. वेळ संपली की युजर्सच्या स्क्रिनवर अलर्ट येतील. यामुळे मर्यादेपेक्षा अधिक वेळ सोशल मीडियावर घालवून होणारा वेळेचा अपव्यय युजर्सना टाळता येणार आहे. तसेच अॅक्टीव्हीटी ग्राफ बार मुळे प्रत्येक दिवशी आपण किती वेळ या ठिकाणी सक्रीय होतो याचीही माहिती त्यांना मिळणार आहे.