26 February 2020

News Flash

भारतात ०.०८ टक्केच अवयवदान, हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी ‘पन्नाशी’

अवयवदानात त्यातही हृदयदानात भारतात पुरेशी जनजागृती झालेली नाही.

’ फोर्टिस मालार रुग्णालयाची माहिती ’
अवयवदानात त्यातही हृदयदानात भारतात पुरेशी जनजागृती झालेली नाही. १२० कोटींच्या आपल्या देशात केवळ ०.०८ टक्केच लोक अवयवदानाला मान्यता देतात. पाश्चात्त्य देशांत मात्र हे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. भारतात जर जनजागृती झाली तर हृदयदानाचे प्रमाण वाढेल आणि हृदयरोपण शस्त्रक्रियेद्वारे आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो, असे मत फोर्टिस मलार रुग्णालयाचे हृदयरोग आणि प्रत्यारोपण केंद्राचे संचालक डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी चेन्नई येथे व्यक्त केले.
चेन्नई येथील ‘फोर्टिस मालार’ रुग्णालयाने आतापर्यंत ५० हृदयरोपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि ज्यांच्यावर यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत असे काही रुग्ण उपस्थित होते. भारतामध्ये हृदयरोपणासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित आहे, निष्णात डॉक्टर आहेत, पुरेशा सुविधा आहेत, पण आवश्यकता आहे ते हृदयदानाची. त्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असा सूर यावेळी उपस्थित डॉक्टरांनी लावला.
भारतात अवयव प्रत्यारोपणात तमिळनाडू राज्य देशात अग्रभागी आहे. कारण त्या राज्यात त्यासंदर्भात जनजागृती झालेली असून, तेथील कायदेही शिथिल आहेत. अन्य राज्यांतही तशीच जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही बालकृष्णन यांनी सांगितले.
‘‘ भारतात २० लाखांपेक्षा अधिक जणांना हृदयरोग आहे. हृदयाचे कार्य मंदावले असेल तर अशा काही रुग्णांवर हृदयरोपण शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवू शकतो. हृदयदान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले हे सहज शक्य आहे,’’ असे फोर्टसि मालारचे डॉ. सुरेश राव यांनी सांगितले.

अवयवाची वाहतूक ‘ड्रोन’द्वारे?
घरोघरी पिझ्झा लवकरात लवकर पोहोचावा यासाठी काही खाद्यकंपन्या भविष्यात ड्रोनचा उपयोग करणार आहेत. पण ‘फोर्टिस मालार’ रुग्णालय ड्रोनचा उपयोग एका महत्त्वाच्या कामासाठी करणार आहे.. अवयवांची वाहतूकही यापुढे ड्रोनद्वारे होऊ शकते. चेन्नई येथे त्यासंदर्भात ड्रोनची चाचणीही करण्यात आली, अशी माहिती डॉ. बालकृष्णन यांनी दिली. अवयवांची वाहतूक जलदगतीने व्हावी यासाठी सध्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ ही संकल्पना वापरली जाते. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. भविष्यात अवयवदानाची संख्या वाढल्यास ‘ग्रीन कॉरिडॉर’ ही संकल्पना कालबाह्य ठरणार आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस यांची वाहतूक होणे शक्य होऊ शकते. त्यासाठी चेन्नईतील मरिना समुद्रकिनाऱ्यापासून महाबलिपूरम येथे ड्रोनच्या मदतीने अवयव वाहतूक करण्याचा प्रयोग करण्यात आला. रस्त्यावरील वाहतुकीला बाधा न आणता हा प्रयोग यशस्वी झाल्याने भविष्यात त्याचा वापर केला जाणार आहे, असे बालकृष्णन यांनी सांगितले.

First Published on September 19, 2015 5:35 am

Web Title: only few peoples are donating organ in india
Next Stories
1 न्याहारीसाठी ‘मॅकडॉनल्ड’ला सर्वाधिक पसंती!
2 चॉकलेटमुळे मेंदुला बळ
3 पत्नीच्या आठवणीसाठी त्याने मुलीसोबत केले अनोखे फोटोसेशन!
Just Now!
X