News Flash

वर्षातले तब्बल ३०० दिवस झोपून असतो हा माणूस! जाणून घ्या Axis Hypersomnia या दुर्मिळ आजाराबाबत

महिन्यातले तब्बल २० - २५ दिवस म्हणजेच वर्षाचे जवळपास ३०० दिवस ही व्यक्ती झोपूनच काढते. एका दुर्मिळ आजारामुळे हा प्रकार घडतोय!

महिन्याभरात ५ दिवसच ही व्यक्ती आपले दुकान सुरु ठेवते (प्रातिनिधीक फोटो Pexels)

निरोगी आरोग्यासाठी पोषक आहारासोबतच आपली झोप पूर्ण होण्यालाही मोठं महत्त्व आहे, हे आपल्याला माहितीच आहे. मुळात झोप कोणाला आवडत नाही? उलट अनेकांच्या तर तो विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. पण एखादा माणूस जर वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस झोपत असेल तर? होय. राजस्थानमधील नगौर जिल्ह्यातील एक व्यक्ती महिन्यातले तब्बल २० – ५० दिवस म्हणजेच वर्षातले जवळपास ३०० दिवस झोपतो. Axis Hypersomnia ह्या दुर्मिळ आजाराने हा व्यक्ती ग्रस्त आहे. ४२ वर्षीय पुखरम राजस्थानमधील भाडवा या गावात राहतो. पण आपल्या ह्या अत्यंत दुर्मिळ आजारामुळे पुखरम हा फक्त महिन्यातले ५ दिवसच आपलं दुकान चालवू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, पुखरमला असलेल्या या आजाराचे निदान २३ वर्षांपूर्वी झाले आहे. पुखरमच्या आयुष्यावर या आजारामुळे इतका मोठा परिणाम झाला आहे की तो झोपलेला असतानाच त्याच्या कुटुंबियांना त्याला आंघोळ घालणं, जेवण भरवणं अशी कामे करून घ्यावी लागतात.

Axis Hypersomnia या अत्यंत दुर्मिळ आजाराला क्रोनिक न्यूमरोजिकल स्लिप डिसऑर्डरही (Chronic Neurological Sleep Disorder) म्हटलं जातं. ज्याची लक्षणं दिवसा झोप येणं किंवा बऱ्याच तासांसाठी (दिवसांतील २४ तासांपैकी ९ ते १० तास ) झोप येणं अशी असतात.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, Axis Hypersomnia म्हणजे रुग्णाला दिवसा अति प्रमाणात झोप येणं किंवा पेंगल्यासारखं होणं. महत्त्वाचं म्हणजे या दुर्मिळ आजारामुळे एकूण लोकसंख्येपैकी ४ ते ६ % लोक बाधित आहे. दुर्दैवाने या लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर याचा अत्यंत मोठा परिणाम जाणवतो.

Axis Hypersomnia होण्यामागची कारणं काय ?

दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा नेहरू एनक्लेव्हच्या जनरल फिजिशियन डॉ. नवनीत कौर याबाबत माहिती देताना म्हणतात की, “स्लिप एपनिया, स्थूलता, अंमली पदार्थांचे सेवन, डोक्याला बसलेला मोठा मार, काही विशिष्ट औषधांचे सेवन, डिप्रेशन याचसोबत काही आनुवंशिक कारणांमुळे देखील एखादा व्यक्ती Axis Hypersomnia या दुर्मिळ आजाराला बळी पडू शकतो.”

लक्षणं काय ?

मुंबईतील स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्यूशन्सचे रिजनरेटिव्ह मेडिसीन रीसर्चर डॉ. प्रदीप महाजन याबाबत म्हणतात की, “Axis Hypersomnia या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना, अलार्म लावूनही सकाळी उठण्यास मोठे कष्ट घ्यावे लागू शकतात, पलंगावरून उठण्यास त्रास होऊ शकतो (ज्याला निद्रा जडत्त्व असेही म्हणतात). अशा व्यक्तींचा दिवसच झोपेत सुरू होऊ शकतो. ज्या स्थितीला स्लिप ड्रंक असेही म्हटले जाते. या शारीरिक स्थितीमुळे सबंधित व्यक्तीला ब्रेन फॉग, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड, नैराश्य अशाही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.”

निदान कसं होतं ?

जर वरीलपैकी लक्षणं, समस्या आपल्याला नियमितपणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉ. प्रदीप महाजन याबाबत सांगतात की, डॉक्टर तुमच्या झोपेच्या सवयींचे परीक्षण करतील. तसेच, ‘तुम्ही दररोज केव्हा उठता? तुम्हाला दिवसा झोप लागते का? तुम्हाला भावनिक समस्या जाणवते का?’ असे काही प्रश्न विचारतील. यासोबतच रक्ताच्या काही तपासण्या, CT स्कॅन यांसह पॉलिसोमोग्राफी नावाची एक झोपेच्या विकारांचे निदान करण्यासाठीची केली जाणारी सर्वसमावेशक स्लिप टेस्ट देखील करण्यास सांगतील.”

दरम्यान, लक्षणं जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. कारण, उपचारांना झालेला विलंब हा तुमच्या पुढील जीवनावर मोठा परिणाम करू शकतो. डॉ. कौर याविषयी बोलताना असा सल्ला देतात की, तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी झोपेच्या योग्य नियमांचे योग्य पालन करत आहात ना ह्याची खात्री करून घ्या. ही बाब बिलकुलच दुर्लक्षित करू नका. तसेच फार चिंताही करू नका. योग्य वेळी योग्य उपचार घेऊन आपण निश्चितपणे ही शारीरिक स्थिती नियंत्रणात आणू शकतो.”

उपचार आणि प्रतिबंध

डॉ. महाजन यांच्या मते, “Axis Hypersomnia या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने ही स्थिती रोखण्यासाठी चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणाऱ्या कॅफेन (Caffeine) घटकापासून दूर रहावे अर्थात चहा कॉफीचे सेवन टाळावे. तसेच झोपेच्या आधी मद्यपान करण्याची सवयही टाळावी. कारण त्यामुळे झोपेसंबंधीचा त्रास होऊ शकतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 8:00 pm

Web Title: person suffering from axis hypersomnia sleeps for 300 days in a year
Next Stories
1 चांगल्या प्रकारची हँड क्रीम लावा! राखा हातांची निगा
2 तुम्हीही नेहमी डिलिव्हरी बॉयला रेटिंग्ज द्यायला विसरता? जाणून घ्या, तुमच्या रेटिंग्जचं महत्त्व
3 तुम्हाला किडनीची समस्या असेल तर ‘हे’ पदार्थ खाऊ नका!
Just Now!
X