प्राणिजन्य चरबीयुक्त पदार्थ जेवणातून हद्दपार करून वनस्पतिजन्य तेल वापरण्यास आपण सुरुवात केली असली तरी त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होत नाही, असे ब्रिटिश मेडिकल जर्नलने एका शोधनिबंधात म्हटले आहे. मांस व दुग्धजन्य पदार्थ यातील प्राणिजन्य चरबीमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून हृदयविकाराचा झटका येतो असे म्हटले जाते, पण आहारात वनस्पतिजन्य तेलांचा वापर करूनही फार फायदा झाल्याचे दिसत नाही. एक हजार लोकांवर याबाबत प्रयोग केले असता त्यांना संपृक्तऐवजी असंपृक्त ओमेगा ६ मेदाम्ले देण्यात आली असता कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले, पण त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी झाले नाही. उलट ज्यांच्यात कोलेस्टेरॉल खूप कमी झाले होते, त्यांच्यात मृत्यूची शक्यता कमी होण्याऐवजी वाढली होती. प्राण्यांचे मांस, लोणी, चीज, क्रीम यामुळे कोलेस्टेरॉल वाढत असल्याने हृदयाच्या धमन्यांतील रक्तप्रवाहातील अडथळे हे कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होतात असे मानले जाते. १९६१ मध्ये अमेरिकी हार्ट असोसिएशनने यावर उपाय म्हणून वनस्पतिजन्य तेलाची शिफारस केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चरबीत आपण घेत असलेल्या उष्मांकातील १० टक्के उष्मांक असतात, पण काही दशकांत जगात मेदयुक्त दुधाला विरोध करण्यात आला. पोर्कची जागा चिकनने तर बटरची जागा मार्गारिन व वनस्पती तेलांनी घेतली, पण मेद किंवा चरबी वाईट असते या गृहीतकाला आव्हान देण्याचे प्रयत्न करण्यात आले.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थचे ख्रिस्तोफर रामदेन यांच्या नेतृत्वाखाली मिनेसोचात काही रुग्णालयांत ४५ वर्षांपूर्वी गोळा केलेली ९४२३ लोकांची माहिती परत तपासण्यात आली. या लोकांनी मक्याचे तेल वापरणे सुरू केले व इतरांनी प्राणिजन्य चरबी चालू ठेवली, त्यात वनस्पतिजन्य तेल ज्यांनी सेवन केले त्यांच्यात लिनोलेइक आम्लामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली, पण त्यामुळे हृदयविकार मात्र टळला नाही. सर्वच ओमेगा तीन मेदाम्लांनी असे घडते का यावर अजून संशोधनाची गरज आहे, असे क्वीन्सलॅण्ड विद्यापीठातील प्राध्यापक लेनर्ट वीरमन यांनी म्हटले आहे. जर कोलेस्टेरॉल हा घटक ठोसपणे हृदयविकाराचे कारण नाही, असा मतप्रवाह पुढे येत असेल तर आणखी संशोधनाची गरज आहे, असे ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनचे जेरेमी पियरसन यांनी सांगितले.