नियमित व्यायाम केल्याने मध्यम ते अती प्रदूषित भागांमध्ये राहणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

व्यायामामुळे हृदयरोगाचा धोका कमी होत असल्याचे सर्वज्ञात आहे, परंतु प्रदूषणामुळे हृदयरोगांचा धोका बळावत असून यामुळे हृदयविकाराचा झटका, दमा, फुप्फुसांचा रोग अशा प्रकारचे रोग होण्याची शक्यता असल्याचे डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या नदीन कुबेश यांनी सांगितले. व्यायामामुळे शरीराला होणारे संरक्षणात्मक फायदे हवेच्या निष्कृष्ट दर्जामुळे कमी होत असल्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे या अभ्यासाच्या प्रमुख कुबेश यांनी म्हटले. हा अभ्यास जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. डेन्मार्क, जर्मनी आणि स्पेनमधील संशोधकांनी ५० ते ६५ वयोगटामधील ५१,८६८ लोकांमध्ये खेळ, सायकल चालवणे, चालणे या व्यायाम प्रकारांचे आणि नायट्रोजन डायऑक्साइडचा (वाहतुकीमुळे उत्सर्जित होणारे एनओ २ प्रदूषक) संसर्गाचे मूल्यांकन केले. १७ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आलेल्यांची संख्या २,९३६ होती, तर पुन्हा हृदयरोगाचा झटका आलेल्यांची संख्या ३२४ होती. प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे हृदयविकाराच्या घटनेमध्ये वाढ होते, परंतु नियमित व्यायाम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले. आठवडय़ातून चार किंवा त्याहून अधिक तास सायकल चालवल्याने पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी कमी होते. आणि सर्व प्रकारचे व्यायामप्रकार केल्यास हे प्रमाण ५८ टक्क्यांनी कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले. खेळांमध्ये भाग घेणाऱ्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका १५ टक्क्य़ांनी कमी होतो, तर सायकल चालवणाऱ्यांमध्ये हे प्रमाण नऊ टक्क्यांनी कमी होते.