मोकळा वेळ घालविण्यासाठी आपण मोबाईलवर सतत काही ना काही करत असतो. यामध्ये सोशल मीडियावर सर्फिंग करण्याबरोबरच मोबाईलवरचे वेगवेगळे गेम खेळणे आणि क्विझची अॅप डाऊनलोड करणे हे सामान्य झाले आहे. आपल्याला असलेले ज्ञान अजमावण्यासाठी आपण या अॅपमधील क्विझ सोडवत राहतो आणि पुढचे टप्पे गाठतो. मात्र आता अशाप्रकारचे अॅप्स वापरणे काहीसे धोक्याचे ठरु शकते. फेसबुककडून अशी क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा नुकताच लिक झाला आहे. नेमटेस्टस (NameTests) या क्वीझ अॅपकडून नुकताच १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला असल्याचे समोर आले आहे.

या वेबसाईटवरुन फेसबुकच्या युआरएलवरुन युजर्सची माहिती काढली जात असल्याचे काही सायबर सुरक्षेतील तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. विशेष म्हणजे युजरनी हे अॅप्लिकेशन डिलीट केले तरीही त्यांचा डेटा हॅकर्सकडे राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कोणालाच समजू द्यायेच नसेल तरीही आता ते शक्य नाही. कारण अशाप्रकारच्या हॅकींगमुळे तुमची माहिती तुम्ही काहीच न करता हॅकर्सपर्यंत सहज पोहोचते. यामध्ये तुमचे फोटो, व्हिडियो, वैयक्तिक माहिती अशा सर्वांचा समावेश असतो. नेमटेस्ट्स डॉट कॉम ही अतिशय प्रसिद्ध अशी वेबसाईट असून त्याद्वारे फेसबुकवर वेगवेगळ्या क्वीझ सातत्याने टाकल्या जातात.

याबाबत नुकतीच चौकशी करण्यात आली असून, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही ज्याद्वारे युजर्सची माहिती हॅक केली जात असल्याचे समजेल. तसेच या माहितीचा गैरवापर केला जात असल्याचीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात सोशल मीडियाचा वापर करताना आणि विशेषकरुन अशाप्रकारची अॅप्लिकेशन्स वापरताना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.